बॉलीवूड अभिनेता विक्रांत मॅसीच्या कुटुंबातील सदस्य वेगवेगळ्या धर्माचे पालन करतात, याचा खुलासा त्यानेच केला केला आहे. विक्रांतचे वडील ख्रिश्चन धर्माचे पालन करतात, तर त्याची आई शीख धर्माचे पालन करते आणि त्याची पत्नी, अभिनेत्री शीतल ठाकूर ही हिंदू आहे. विक्रांतचा भाऊ मोईन याने केवळ १७ वर्षांचा असताना इस्लाम धर्म स्वीकारला.

विक्रांत करवा चौथला पत्नी शीतलच्या पाया पडला होता, त्याने हे फोटो शेअर केल्यावर अनेकांनी त्याला ऑनलाइन ट्रोल केलं. तर काहींनी त्याचं कौतुक केलं. आता धार्मिक श्रद्धेबाबत विक्रांतने त्याचं मत मांडलं. तो आणि त्याचे कुटुंबीय सर्व धर्मांचा सारखाच आदर करतात, असं त्याने सांगितलं. “माझी आई शीख कुटुंबात जन्मली, पण ती तिथे टिकली लावून उभी होती. आपल्याला लहानपणापासून मंदिरात जायला शिकवले जातं. नवरात्रीत माझ्या घराखाली माता राणीचे मंडप लावण्यात आले होते. त्यामुळे, पत्नीच्या पाया पडणं ही एक अतिशय सामान्य गोष्ट आहे,” असं विक्रांत मॅसी शुभांकर मिश्राला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला.

हेही वाचा – वडील सुपरस्टार, स्वतःही केले हिट चित्रपट; आता जग फिरतोय ‘हा’ अभिनेता, लोकांच्या शेतातही करतो काम

विक्रांत त्याच्या कुटुंबातील धार्मिक विविधतेबद्दल म्हणाला…

एका धर्मनिरपेक्ष कुटुंबात वाढल्याचं विक्रांतने सांगितलं. “माझे वडील ख्रिश्चन धर्म पाळतात आणि ते वैष्णोदेवी मंदिरात सहा वेळा गेले आहेत. ते आताही आठवड्यातून दोन वेळा चर्चला जातात. राहुल, रोहित या नावाचे अनेक ख्रिश्चन तुम्हाला आपल्या देशात आढळतील. आम्ही स्वतः गुरुद्वारांमध्ये जातो आणि बरेच हिंदू अजमेर शरीफ दर्ग्यात जातात. हा आपला हिंदुस्थान आहे. आता लोकांना या गोष्टींचं इतकं आश्चर्य का वाटतं? माझ्या घरात मंदिर आहे. माझ्या मुलाचे नाव वरदान आहे,” असं विक्रांत म्हणाला.

Vikrant Massey family
अभिनेता विक्रांत मॅसी, त्याची पत्नी शीतल ठाकूर व अभिनेत्याचे आई-वडील (फोटो – इन्स्टाग्राम)

विक्रांत पुढे म्हणाला की त्याचा भाऊ मोईन देखील सर्व सेलिब्रेशन्समध्ये सहभागी होतो. “माझा भाऊ दिवाळीत लक्ष्मीपूजन करतो. त्याने इस्लाम धर्म स्वीकारणं ही त्याची वैयक्तिक निवड आहे. पण आम्ही दिवाळी आणि होळी एकत्र साजरी करतो. ईदला आम्ही त्याच्या घरी बिर्याणी खातो,” असं विक्रांत पुढे म्हणाला.

‘स्त्री २’ नव्हे तर ‘हा’ आहे २०२४ मध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट; जगभरात कमावले तब्बल…

विक्रांत मेस्सीचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट उद्या (१५ सप्टेंबर रोजी) प्रदर्शित होईल. या चित्रपटात राशी खन्ना व रिद्धी डोगरा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. गुजरातमधील गोध्रा येथे २००२ साली घडलेल्या घटनेवर आधारित हा चित्रपट आहे.

Story img Loader