बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतात. कधी त्यांच्या चित्रपटांमुळे, कधी सोशल मीडियावरील वक्तव्यामुळे, तर कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे हे कलाकार कायम चर्चेत असतात. महत्त्वाचे म्हणजे या कलाकारांबरोबरच त्यांच्या मुलांविषयीदेखील चाहत्यांना उत्सुकता असते. बॉलीवूडमधील आलिया भट्ट आणि रणबीर कपूर लाडके जोडपेदेखील आपल्या चित्रपटांशिवाय मुलगी ‘राहा’मुळे मोठ्या चर्चेत असते. आलियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आई म्हणून ती आपली भूमिका कशी निभावते याबद्दल वक्तव्य केले आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत आलियाने म्हटले आहे की, जेव्हा मी एक अभिनेत्री आणि आईच्या भूमिकेत असते तेव्हा मी कोणतीही गणती करत नाही. आई म्हणून मी ज्या गोष्टी करते किंवा राहासाठी गोष्टी निवडते तेव्हा तिच्यासाठी काय योग्य आहे याचा विचार करुन निवडते. पुढे बोलताना अभिनेत्री म्हणते, “मला वाटते की, माझ्या मुलीने स्वत:चे वेगळे अस्तित्व निर्माण करावे. राहा जशी मोठी होईल तसे तिने तिचे म्हणून वेगळे व्यक्तिमत्त्व निर्माण केले पाहिजे.” आलिया म्हणते, “माझा विश्वास आहे की, प्रत्येक मूल त्याचे वेगळे व्यक्तिमत्त्व निर्माण करते. तुम्ही त्यांचा सांभाळ करू शकता, त्यांची काळजी घेऊ शकता. पण, त्यांना त्यांचे अस्तित्व शोधता आले पाहिजे. मला वाटते की, राहाने असे काहीही करू नये, निवडू नये; ज्यामध्ये तिला अवघडल्यासारखे होईल. ती जे काही निवडेल, त्यामध्ये तिला सहज वाटले पाहिजे.”

हेही वाचा : “आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो, मग गोठा, पत्र्याचं घर…”, अखेर रुपाली भोसलेचं स्वप्न झालं पूर्ण! दाखवली नव्या घराची झलक

चित्रपटांच्या निवडीबाबत बोलताना आलिया भट्ट म्हणते की, ज्या चित्रपटांची मी निर्मिती केली आहे किंवा जे चित्रपट मी निवडले आहेत, त्यामध्ये गोष्ट असते. महिला सक्षमीकरण, कौटुंबिक मूल्ये किंवा असे काहीतरी; ज्यामध्ये दयाभाव, प्रेम व सुरक्षा असते आणि अशा गोष्टींना माझ्या लेखी फार महत्त्व आहे. काही वेळा मी असेही चित्रपट निवडते; ज्यामध्ये असणाऱ्या मूल्यांकडे मी स्वाभाविकपणे आकर्षित होते. मी अनेकदा असेही चित्रपट निवडले आहेत; जे मला समजत नाहीत इतके ते अद्भुत होते. त्यामुळे मी कशाचीही गणती करीत नाही. आलियाने असेही म्हटले आहे की, जेव्हा जेव्हा शाहरुख खानचे नाव घेतले जाते तेव्हा तेव्हा तुम्ही प्रेमाविषयी विचार करता आणि तुमच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण होतो. तसेच या भावनेची गणती होऊ शकत नाही. मला माहीत नाही की, मी काय वारसा ठेवून जाणार आहे. पण मला असे वाटते की, जेव्हा लोक माझ्याबद्दल विचार करतील तेव्हा त्यांना काहीतरी जाणवले पाहिजे.

आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच ‘जिगरा’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.