बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार आहेत ज्यांना पहिल्या लग्नात वाईट अनुभव आले. काहींनी प्रेमाला दुसरी संधी दिली आणि नंतर लग्नबंधनात अडकले, तर काहींनी एकटं राहणं पसंत केलं. अशीच एक लोकप्रिय अभिनेत्री आहे, तिचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. घटस्फोटानंतर तिच्या पतीचं दिवाळीच्या दिवशीच निधन झालं होतं.

ही अभिनेत्री म्हणजे अर्चना पूरन सिंग (Archana Puran Singh) होय. ४३ वर्षांपासून सिनेविश्वात सक्रिय असलेल्या अर्चनाने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. तिने खूप नाव व पैसा कमावला. पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात बरेच चढ-उतार आले. खूप कमी लोकांना माहीत आहे की अर्चनाच्या पहिल्या पतीचं निधन झालं होतं.

परमीत सेठी हा अर्चनाचा दुसरा पती आहे. तिचं पहिलं लग्न गुरिंदर नावाच्या व्यक्तीशी झालं होतं. गुरिंदर सनी रेयार नावाने मॉडेलिंगच्या दुनियेत ओळखला जायचा. तो एक लोकप्रिय मॉडेल होता आणि त्याने जाहिरातीतही काम केलं होतं.

दिवाळीच्या दिवशी झालं होतं निधन

अर्चनाचा पहिला पती गुरिंदर उर्फ ​​सनी रेयार याचा १९९१ साली दिवाळीच्या दिवशी मृत्यू झाला होता. हा मृत्यू चुकून गोळी लागल्याने झाला, असं म्हटलं जातं. पण त्याने आत्महत्या केल्याचा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

अर्चना-गुरिंदरचा झाला होता घटस्फोट

अर्चना पूरन सिंग आणि गुरिंदर यांचा लग्नाच्या काही वर्षांनी घटस्फोट झाला. अर्चना या लग्नात खूश नव्हती. खरं तर अर्चना तिच्या पहिल्या लग्नाबद्दल किंवा घटस्फोटाबद्दल फार बोलत नाही. पण घटस्फोटानंतर अर्चना खूप कठीण टप्प्यातून जात होती. तिने पुन्हा लग्न करायचं नाही असंही ठरवलं होतं.

अर्चना नंतर परमीत सेठीला भेटली आणि तिचं मत बदललं. “माझं पहिलं लग्न अपयशी ठरलं होतं, त्यामुळे आयुष्यात पुन्हा पुरूष नको असं मी ठरवलं होतं. पण परमीतला भेटल्यावर मला जाणवलं की पुरूषही प्रेमळ, संवेदनशील असतात. सगळेच हिंसा करणारे व अधिकार गाजवणारे नसतात,” असं अर्चना एकदा म्हणाली होती. अर्चनाने हे विधान तिच्या पहिल्या लग्नातील अनुभवामुळे केलं होतं, अशी चर्चा झाली होती.

अर्चनाने परमीत सेठीशी केलं दुसरं लग्न

अर्चना व परमीत यांनी १९९२ साली लग्न केलं. लग्नाआधी ते काही वर्षे लिव्ह इनमध्ये राहिले होते. लग्न करताना त्यांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. या दोघांनी त्यांचं लग्न चार वर्षे लपवून ठेवलं होतं. अर्चनाने एकदा कपिल शर्माच्या शोमध्ये म्हटलं होतं की त्यांच्या लग्नाला परमीतच्या आई-वडिलांचा विरोध होता.

परमीत व अर्चनाच्या लग्नाला ३३ वर्षे झाली आहेत. या जोडप्याला दोन मुलं आहेत. अर्चना २३५ कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.