हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. लतादीदी, आशा भोसले, दुर्गा खोटे, देविका रानी अशा दिग्गजांनंतर आशा पारेख या ७ व्या महिला कलाकार आहेत ज्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. इतकंच नाही तर १९९२ मध्ये आशाजी यान पद्मश्री पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता. आशा पारेख यांनी त्यांच्या करिकीर्दीत एकाहून एक असे सरस चित्रपट केले आहेत. नुकताच आपल्या वाढदिवशी एका छोट्या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या गाजलेल्या ‘लव्ह इन टोकियो’ या चित्रपटाच्या रिमेकवर भाष्य केलं आहे.
१९६६ सालचा ‘लव्ह इन टोकियो’ हा प्रमोद चक्रवर्ती यांचा चित्रपट चांगलाच गाजला होता. यातली सगळी गाणी आजही लोकांच्या तोंडी आपल्याला ऐकायला मिळतात. या चित्रपटात जॉय मुखर्जी आणि आशा पारेख यांची मुख्य भूमिका होती. त्यावेळी या चित्रपटाला लोकांनी चांगलीच पसंती दर्शवली होती.
आणखी वाचा : “तू तुझ्या आईला…” अभिनेत्री नेहा धुपियाची मुलाच्या वाढदिवसानिमित्त भावुक पोस्ट व्हायरल
याच चित्रपटाचा रिमेक आज बनला तर त्यात आशा पारेख यांची भूमिका कोणती अभिनेत्री उत्तमरित्या सकारू शकेल यावर आशाजी यांनी उत्तर दिलं आहे. आशा पारेख म्हणाल्या, “जर या चित्रपटाचा रिमेक निघाला तर मला वाटतं आलिया भट्ट ही यामध्ये माझी भूमिका उत्तमरित्या साकारू शकेल.” शिवाय आलिया बरोबरच आशा पारेख यांना दीपिका पदूकोणचं कामंही प्रचंड आवडतं असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
यबरोबरच चित्रपटसृष्टीत होणाऱ्या बदलांवरही आशाजी यांनी टिप्पणी केली आहे. त्या म्हणतात, “सध्याच्या अभिनेत्री या लग्नानंतरही चित्रपटात काम करतात ही खूप चांगली गोष्ट आहे. आमच्या काळात असं होत नव्हतं याबद्दल खंत वाटते, सध्याचा चित्रपट तांत्रिक दृष्ट्या प्रगत आहे पण आधीच्या चित्रपटांसारखं संगीत सध्या ऐकायला मिळणं फार दुर्मिळ झालं आह.” आशा पारेख चित्रपटसृष्टीत होणाऱ्या या बदलांबद्दल समाधानी आहेत.