‘बर्फी’, ‘दो और दो प्यार’सह अनेक चित्रपटांमध्ये काम करणारी बॉलीवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ तिच्या पोस्टमुळे चर्चेत आहे. ३८ वर्षांच्या इलियानाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोतून तिने दुसऱ्यांदा गरोदर असल्याचे संकेत दिले आहेत. पहिल्या मुलाच्या जन्मानंतर दीड वर्षांनी इलियाना दुसऱ्यांना आई होणार आहे.

इलियाना डिक्रुझने पुन्हा आनंदाची बातमी दिली आहे. इलियाना पहिल्या बाळाच्या जन्मानंतर दीड वर्षांनी दुसऱ्यांदा आई होणार आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक फोटो पोस्ट केला आहे. मिडनाइट स्नॅक्सचा फोटो स्टोरीला शेअर करत तिने दिलेलं कॅप्शन चर्चेत आहे. या फोटोवर इलियानाने लिहिलं, ‘तुम्ही प्रेग्नंट आहेस हे न सांगता सांगा.’ इलियानाच्या या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीच्या चर्चांना उधाण आले आहे.

इलियानाने यापूर्वी १ जानेवारी रोजी शेअर केलेल्या व्हिडीओमध्येही दुसऱ्या प्रेग्नेन्सीचे संकेत दिले होते. इलियाना, तिचा पती मायकल डोलन आणि त्यांचा मुलगा या तिघांचेही अनेक सुंदर फोटो व आठवणी या व्हिडीओ होत्या. जानेवारी २०२४ ते डिसेंबर २०२४ या १२ महिन्यांमधील काही खास क्षण इलियानाने शेअर केले होते. यापैकी ऑक्टोबर महिन्यातील फोटोत ती हातात प्रेग्नेन्सी टेस्ट किट घेऊन दिसत होती. तेव्हापासून इलियाना दुसऱ्यांदा आई होणार, अशी चर्चा रंगली; मात्र अभिनेत्रीने तशी काहीच पोस्ट केली नव्हती. आता या स्टोरीतून ती गरोदर असून यावर्षी ती दुसऱ्या बाळाचं स्वागत करणार असं दिसतंय.

पाहा पोस्ट-

ileana dcruz second pregnancy post
इलियाना डिक्रुझची इन्स्टाग्राम स्टोरी (फोटो- स्क्रीनशॉट)

इलियाना डिक्रुझच्या जोडीदाराचे नाव मायकल डोलन आहे. त्यांनी गुपचूप लग्न केलं होतं, असं म्हटलं जातं. पण इलियाना किंवा मायकलने याबद्दल कधीच प्रतिक्रिया दिलेली नाही. इलियानाने ती आई होणार असल्याची घोषणा केल्यावर तिच्या लग्नाबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर तिने जोडीदार मायकल डोलनचे काही फोटो शेअर केले होते. हे दोघेही ऑगस्ट २०२३ मध्ये आई बाबा झाले. त्यांच्या मुलाचे नाव कोआ फीनिक्स डोलन आहे. इलियाना अनेकदा मुलाचे व पतीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

इलियानाच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास ती अखेरची ‘दो और दो प्यार’ या सिनेमात दिसली होती. या चित्रपटात विद्या बालन, प्रतीक गांधी व सेंधिल राममूर्ती हे कलाकार होते. हा चित्रपट सध्या डिस्ने+ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

Story img Loader