Actress Janhvi Kapoor Hospitalized in Mumbai: अभिनेत्री जान्हवी कपूरची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे जान्हवी कपूरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जान्हवी कपूर चेन्नईहून मुंबईला परतली तेव्हा तिची प्रकृती बिघडली आहे, ज्यानंतर तिला मुंबईतल्या एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तिचे वडील बोनी कपूर यांनी ही माहिती दिली आहे. मुंबईत आल्यानंतर तिची प्रकृती बिघडली त्यामुळे आम्ही तिला रुग्णालयात आणलं असं बोनी कपूर यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय घडलं?
जान्हवी कपूर चेन्नईला एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी गेली होती. त्यानंतर ती मुंबईत आली. या दरम्यान तिच्या खाण्यात काही पदार्थ आला असावा त्यामुळे तिला फूड पॉयझनिंग झालं. यानंतर जान्हवी कपूरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विमानतळावर उतरल्यावर तिने काही पदार्थ खाल्ला त्यातून तिला ही विषबाधा झाली. कारण यानंतरच तिची प्रकृती बिघडली. त्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मिड डे शी बोलताना बोनी कपूर यांनी ही माहिती दिली. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे असंही त्यांनी सांगितलं.
हे पण वाचा- “तिच्यात मला श्रीदेवीची…”, जान्हवी कपूरबद्दल प्रसिद्ध अभिनेत्याचे वक्तव्य, म्हणाला…
जान्हवी कपूरला डॉक्टरांच्या सल्ल्यानेच रुग्णालयात करण्यात आलं दाखल
जान्हवी कपूरला बुधवारी खूप अशक्तपणा जाणवत होता. त्यानंतर तिला गुरुवारीही त्रास होऊ लागला. ज्यानंतर तिला एच. एन. रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच तिला या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जान्हवीला शुक्रवारपर्यंत रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो अशी शक्यता आहे. गेले काही आठवडे जान्हवी शूटिंगमध्ये व्यग्र होती. तसंच मुंबईत अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा पार पडला या सोहळ्यालाही जान्हवी गेली होती. सध्या जान्हवी तिच्या उलझ या सिनेमामुळे चर्चेत या चित्रपटात ती आयएफस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. उलझचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित झाला.
जान्हवी कपूर ही प्रसिद्ध अभिनेत्री
जान्हवी कपूर ही प्रसिद्ध दिग्दर्शक बोनी कपूर आणि श्रीदेवी या दोघांची मुलगी आहे. धडक हा तिचा पहिला सिनेमा होता. हा सिनेमा मराठीतल्या सैराटचा रिमेक होता. हा सिनेमा येणार म्हणून श्रीदेवीला प्रचंड उत्सुकता होती. पण जान्हवीचा सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच श्रीदेवीचं निधन झालं. त्यानंतर जान्हवीने विविध चित्रपटांमधून आणि वेब सीरिजमधून कामं केली आहेत. तिच्या अभिनयाचं कौतुकही अनेकांनी केलं आहे. नुकतीच ती अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नातही आली होती. यावेळी तिचा लूकही चर्चेत राहिला. आता फूड इन्फेक्शन झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.