बॉलीवूडचे कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी त्यांच्या चित्रपटांच्या निमित्ताने, कधी सोशल मीडियावरील पोस्टमुळे, तर कधी त्यांच्या वक्तव्यामुळे हे कलाकार चर्चांचा भाग बनतात. बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आजारपणाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठ्या चर्चेत आहे.
काय म्हणाली जान्हवी कपूर?
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवीने आपल्या आजारपणाबद्दल खुलासा केला आहे. या मुलाखतीत तिने सांगितले की, मी इतकी आजारी पडले होते की, मला दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं. माझी प्रतिकारशक्ती खूप कमी झाली होती. ‘मिस अॅण्ड मिसेस माही’ या चित्रपटाचे प्रमोशन सुरू होण्याआधीपासूनच ती सतत काम करत होती. यादरम्यान, मी सतत प्रवासदेखील करत होते, शूटिंग सुरू होते. या संपूर्ण महिन्यात मी खूप थकून गेले होते. ती पुढे म्हणते की, मी एका कार्यक्रमासाठी चेन्नईला गेले होते. तिथून परतल्यावर मला अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे मी घरीच राहण्याचा निर्णय घेतला आणि कामाचे वेळापत्रक बदलले. मात्र, गुरुवारी प्रकृती खालावली. सुरुवातीला असे वाटत होते, काहीतरी भेसळयुक्त पदार्थ खाल्ला गेला असावा आणि त्यामुळे मला आजारी पडल्यासारखे वाटत आहे. पण, जेव्हा रक्ताची चाचणी केली तेव्हा तर ते वेगळीच बाब समोर आली होती. तिची पचनशक्ती चांगली झाली; मात्र तिला तीव्र अंगदुखी, अशक्तपणाचा सामना करावा लागला. मला माझ्या रोजच्या गोष्टी करण्यात अडचणी येत होत्या, त्यासाठी मला कोणाची तरी मदत घ्यावी लागत होती. त्यामुळे अपंगत्व आल्यासारखे वाटत होते. मी त्यावेळी चालू शकत नव्हते, व्यवस्थित खाऊ-पिऊ शकत नव्हते.
जान्हवी कपूरने पुढे म्हटले आहे की, माझ्या शरीराला आरामाची गरज होती आणि तुम्ही तुमच्या शरीराचे ऐकणे गरजेचे असते. तुमचे काम आणि इतर गोष्टी कितीही महत्त्वाच्या असल्या तरी तुमच्या आरोग्याची काळजी घेणे ही सर्वांत मोठी गोष्ट असते. आता जान्हवीने पुन्हा कामाला सुरुवात केली असून ती म्हणते, मला माझ्या शरीराबद्दल, तंदुरुस्त असल्याबद्दल नव्याने आदर वाटू लागला आहे.
दरम्यान, जान्हवी लवकरच तिच्या उलझ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून, त्यामध्ये जान्हवी कपूर सुहानाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहे. तरुण डेप्युटी हाय कमिशनर म्हणून सुहाना काम करताना दिसत आहे; जी लंडन दूतावासातील कठीण मोहिमेवर बारीक नजर ठेवते. ‘उलझ’ चित्रपटात अभिनेता गुलशन देवैया एका गुप्तहेराच्या भूमिकेत आहे. त्याबरोबरच रोशन मॅथ्यूदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये गुप्तहेरांचे जीवन कसे धोक्यात येते आणि सुहानाला जगण्यासाठी कसा संघर्ष करावा लागतो, याबद्दलची गोष्ट पाहायला मिळत आहे. सुधांशु सारिया दिग्दर्शित ‘उलझ’ चित्रपट २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.