बॉलीवूड अभिनेत्री काजोल सध्या ‘लस्ट स्टोरीज २’ आणि ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. काजोल आणि तिची आई तनुजा यांच्यात खूप सुंदर नाते असून आपल्या आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्रीने तिच्या सिनेक्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. ज्याप्रमाणे तनुजा यांनी काजोलला साथ दिली अगदी त्याचप्रमाणे अभिनेत्री आपल्या मुलीला खंबीरपणे साथ देत आहे. अलीकडेच दिलेल्या एका मुलाखतीत काजोलने नीसाचे कौतुक करीत एक किस्सा सांगितला आहे.
काजोलला ‘एनडीटीव्ही’च्या मुलाखतीत “नीसा देवगण पापाराझींना कशी सांभाळून घेते?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत अभिनेत्री म्हणाली, “पापाराझींना कसे सामोरे जायचे या गोष्टी मी खरंच तिला शिकवल्या नाहीत. तिने तिच्या अनुभवातून हे सर्व शिकून घेतले आहे.”
हेही वाचा : “खेळ तर आता सुरू…”, महाराष्ट्राच्या राजकारणावर मराठी अभिनेत्याने केलेले ट्वीट चर्चेत
नीसाच्या बाबतीत एक जुना किस्सा सांगत काजोल म्हणाली, “नीसा लहान असताना एकदा आम्ही जयपूरला गेलो होतो, तेव्हा पहिल्यांदा तिला पापाराझींचा अनुभव आला. जयपूरला आम्ही दोघी एकट्याच प्रवास करत होतो आणि आमच्याबरोबर कोणताही सुरक्षारक्षक नव्हता. अचानक फोटोग्राफर्सनी चारही बाजूंनी आम्हाला घेरले आणि आरडाओरडा सुरु केला. यामुळे नीसा घाबरून रडू लागली. मी तिला जवळ घेतले आणि आम्ही दोघीही सरळ गाडीत बसलो. त्यानंतर मी निसाला माझे काम कसे आहे हे नीट समजावून सांगितले.”
हेही वाचा : “Happy Anniversary मालकीण!”, अमेय वाघने लग्नाच्या वाढदिवसानिमित्त बायकोसाठी शेअर केली रोमॅंटिक पोस्ट
नीसाचे कौतुक करत अभिनेत्री म्हणाली, “नीसा त्या प्रसंगापासून हळूहळू अनुभवातून सर्व काही शिकली. आता ती पापाराझींना उत्तम हॅंडल करते. तिला कितीही घेरण्याचा प्रयत्न केला तरीही नीसा त्यांचा सन्मान करते. आज तिच्याजागी मी असते, तर एवढ्यात त्यांना मी माझी चप्पल दाखवली असती (मेरी तो चप्पल निकल चुकी होती)”
हेही वाचा : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर शरद पोंक्षेंनी मांडले परखड मत; पोस्ट शेअर करत म्हणाले, “शब्द आज वारले”
दरम्यान, अभिनेत्रीचा ‘लस्ट स्टोरीज २’ चित्रपट २९ जूनला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला असून लवकरच काजोल ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही सीरिज १४ जुलैला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.