बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही नेहमीच तिच्या दिलखुलास स्वभावामुळे ओळखली जाते. काजोल लवकरच ‘द ट्रायल’ या वेबसीरिजमध्ये झळकणार आहे. सध्या ती या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच काजोलने देशातील राजकीय नेत्यांबद्दल एक विधान केले होते. त्यानंतर आता तिने त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
काजोल ही सध्या ‘द ट्रायल’ या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकंतच तिने ‘द क्विंट’ या वेबसाईटला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणबद्दल भाष्य केले होते. “भारतातील बदल हे फार मंद गतीने होत आहेत, कारण आपण आपल्या परंपरा, विचार यात अडकलो आहोत आणि याचा अर्थातच संबंध शिक्षणाशी आहे. आपल्याकडे असे राजकीय नेते आहेत ज्यांची कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नाही. मला माफ करा, पण मी बाहेर जाऊन हे पुन्हा सांगेन. देशावर राजकारण्यांची सत्ता आहे. पण यातील अनेक नेते असे आहेत, ज्यांच्याकडे योग्य दृष्टीकोनही नाही आणि तो फक्त शिक्षणामुळे येतो”, असे काजोल म्हणाली होती.
आणखी वाचा : “आपल्या देशातील नेते अशिक्षित, त्यांच्याकडे…”, बॉलिवूड अभिनेत्री काजोलचं वक्तव्य चर्चेत
काजोलच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. तर काहींनी तिच्या या वक्तव्याबद्दल समर्थन केले आहे. यानंतर आता काजोलने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक ट्वीट केले आहे.
“मी फक्त शिक्षण आणि त्याचे महत्त्व यावर बोलत होते. माझा हेतू कोणत्याही राजकीय नेत्याला बदनाम करण्याचा नव्हता. आपल्याकडे काही महान नेते आहेत, जे देशाला योग्य मार्गावर घेऊन जात आहेत”, असे ट्वीट काजोलने केले आहे.
दरम्यान काजोल ही ‘द ट्रायल’ या वेबसीरिजद्वारे ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे. ही वेबसीरिज अमेरिकन कोर्टरूम ड्रामा ‘द गुड वाईफ’चे हिंदी व्हर्जन आहे. यात ती जिशू सेनगुप्ता तिच्या पतीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिज १४ जुलै प्रदर्शित होणार आहे.