अभिनेत्री कतरिना कैफनं आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सुरुवातीच्या काळात हिंदी स्पष्ट बोलता येत नसल्यामुळे तिच्याकडून अनेक प्रोजेक्ट हुकले. पण यावर निराश न होता ती तिथेच थांबली नाही. आज ती बॉलीवूडमध्ये आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. सौंदर्य व अभिनयासाठी ती आता नावाजली जाते. २० वर्षांहून अधिक काळ बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असणारी कतरिना आज ४०वा वाढदिवस साजरा करत आहे. कतरिनाच्या या वाढदिवसानिमित्तानं तिच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
कतरिनाचा जन्म १६ जुलै १९८३ साली हाँगकाँगच्या तुरकोट्टे कुल येथे झाला. कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे कश्मिरी वंशाचे ब्रिटिश बिझनेसमन होते; तर आई सुजेन टॉरकेटी या मूळच्या ब्रिटिशच होत्या. कतरिना जेव्हा लहान होती, तेव्हाच तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. त्यामुळे कतरिना व तिची बहिणी ईशाबेला या दोघांना तिच्या आईनंच सांभाळलं. ही अभिनेत्री वयाच्या १४ व्या वर्षी आपल्या कुटुंबाबरोबर हवाई येथे स्थायिक झाली. त्यानंतर ती लंडनमध्ये स्थायिक झाली. माहितीनुसार, कतरिनाचं बालपण फक्त या दोनच देशात नव्हे, तर १८ देशांत गेलं. सततच्या या प्रवासामुळे ही अभिनेत्री कधीच शाळेत जाऊन शिकली नाही. तिला घरीच शिकवण्यासाठी एक शिक्षक ठेवले होते.
कतरिनानं वयाच्या १४ व्या वर्षीचं मॉडलिंग क्षेत्रात पाऊल ठेवलं. हवाईमध्ये तिनं ब्युटी कॉन्टेस्ट जिंकली. त्यानंतर तिनं बऱ्याच सौंदर्य स्पर्धांत भाग घेतला. मग तिला एका दागिन्यांच्या जाहिरातीमध्ये काम करायला मिळालं. तिनं लंडनमध्ये फ्रीलान्स मॉडेलिंगसुद्धा केलं होतं.
हेही वाचा – तमन्ना भाटियाबरोबरचं अफेअर पब्लिसिटी स्टंट? विजय वर्मा उत्तर देत म्हणाला…
२००३ मध्ये या अभिनेत्रीनं बॉलीवूडमध्ये ‘बूम’ चित्रपटातून पदार्पण केलं. या पहिल्याच चित्रपटात कतरिना बोल्ड सीनमुळे खूप चर्चेत राहिली. याच चित्रपटात कतरिनानं आपलं नाव बदललं. निर्माती आयेशा श्रॉफनं कतरिना टॉरकेटीऐवजी कतरिना कैफ असं तिचं ठेवलं. कारण कतरिनाचं आडनाव उच्चारण्यासाठी थोडं अवघड होत. त्यामुळे पहिल्यांदा तिचं नाव कतरिना काजी निवडलं गेलं होतं; पण नंतर कतरिना कैफ या नावावर शिक्कामोर्तब झालं. या अभिनेत्रीनं ‘बूम’ चित्रपटानंतर सलमानच्या ‘मैंने प्यार क्यो किया’, ‘हमको दीवाना कर गए’, ‘नमस्ते लंडन’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘जब तक है जान’ आणि ‘टागयर’ अशा अनेक चित्रपटांत तिनं काम केलं.