अभिनेत्री कतरिना कैफचा बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये समावेश आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. पण कलाक्षेत्रामध्ये काम करत असताना सुरुवातीच्या दिवसांमध्ये तिला बऱ्याच कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला. इतकंच नव्हे तर तिला एका चित्रपटामधूनही बाहेर काढण्यात आलं. याबाबत कतरिनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये खुलासा केला आहे.
‘आज तक’च्या वृत्तानुसार कतरिनाने सांगितलं की, “‘साया’ चित्रपटामधून मला बाहेर काढण्यात आलं आहे. चित्रपटामधून तुला काढलं नाही तर त्याजागी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतलं आहे असं मला सांगितलं गेलं. जॉन अब्राहन व तारा शर्माची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट अनुराग बासूचा होता. मी एक सीन चित्रीत केल्यानंतर मला चित्रपटामधून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी मला असं वाटलं की माझं आयुष्य व करिअर आता संपलं.”
पुढे ती म्हणाली, “कलाकार म्हटलं की नकार सहन करावाच लागतो. तुझ्यामध्ये काहीच चांगलं नाही, तू अभिनेत्री बनूच शकत नाही असं कित्येकांनी माझ्या तोंडावर येऊन सांगितलं. तेव्हा मी खूप रडले. पण जे ध्येय गाठायचं होतं तो प्रवास करणं मी कधीच सोडलं नाही.”
आणखी वाचा – Video : ‘तू तेव्हा तशी’ मालिकेच्या ‘त्या’ सीनदरम्यान एक चूक घडली अन्…; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये बॉलिवूडने कतरिनाला आपलंस केलं नसल्याचं तिच्या बोलण्यामधून स्पष्ट होतं. पण तिने आपल्या कलेच्या जोरावर ‘राजनीति’, ‘टाइगर जिंदा है’, ‘जीरो’, ‘जब तक है जान’, ‘अजब प्रेम की गजब कहानी’, ‘नमस्ते लंडन’ सारखे चित्रपट केले. आता तिचा ‘फोन भूत’ चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे.