बॉलिवूडमधील खडूस सासू किंवा ‘रामायणा’तील मंथराला चेहरा देणाऱ्या ललिता पवार यांनी ४०चं दशक गाजवलं. वयाच्या ९व्या वर्षापासून त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करायला सुरुवात केली होती. तब्बल ७० वर्ष विविधांगी भूमिकांतून त्यांनी प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. जवळपास ७००हून अधिक चित्रपटांत काम केलेल्या ललिता पवार यांची आज जयंती आहे. यानिमित्ताने त्यांच्याबद्दल जाणून घेऊया.
ललिता पवार यांचा जन्म १८ एप्रिल १९१६ रोजी श्रीमंत कुटुंबात झाला होता. त्यांच्या वडिलांचा कपड्यांचा व्यवसाय होता. अभिनयाची आवड असल्याने त्यांनी बालपणापासूनच काम करायला सुरुवात केली होती. ४०च्या दशकात त्यांनी अनेक चित्रपटांत मुख्य भूमिका साकारल्या. परंतु, तरीही त्यांना यश मिळालं नाही. १९४२मध्ये ‘जंग ए आजादी’ चित्रपटाच्या सेटवर अभिनेता भगवान दादाने त्यांच्या कानशिलात लगावली होती. यामुळे ललिता पवार यांना त्यांचा डावा डोळा गमवावा लागला होता. माझ्यावर राग असल्यामुळे त्यांनी जोरात कानाखाली मारल्याचा खुलासा ललिता पवार यांनी मुलाखतीत केला होता.
रामायण या मालिकेत साकारलेल्या मंथरा या पात्राने ललिता पवार यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली होती. त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिकाही साकारल्या होत्या. करिअरप्रमाणेच त्यांचं वैयक्तिक जीवनही चर्चेत होतं. ललिता पवार यांच्या पतीचं अभिनेत्रीच्या बहिणीबरोबरच अफेअर होतं. त्यांच्या पतीने ललिता पवार यांना घटस्फोट घेत आपल्या मेहुणीबरोबरच संसार थाटला. त्यानंतर ललिता पवार यांनी राज गुप्ता यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यानंतर त्यांनी एका मुलाला जन्म दिला.
ललिता पवार या तोंडाच्या कर्करोगाने ग्रस्त होत्या. नकारात्मक भूमिका साकारल्यामुळेच कर्करोग झाल्याचं त्यांना वाटतं होतं. २४ फेब्रुवारी १९९८ रोजी ललिता पवार यांचा पुणे येथे मृत्यू झाला. शेवटच्या घटका मोजत असताना ललिता पवार घरी एकट्याच होत्या. मृत्यूनंतर तीन दिवस त्यांचा मृतदेह घरातच पडून होता. ललिता पवार यांच्या मुलाने घरी फोन केल्यावर कोणी उचलला नाही, म्हणून संपूर्ण कुटुंब पुण्यातील घरी आले असता त्यांना ललिता पवार यांचा मृतदेह आढळला होता.