अभिनेत्री माधुरी दीक्षित नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या सोशल मीडियावरील सुंदर फोटोमुळे तर कधी जबरदस्त डान्समुळे ती चर्चेत असते. नुकतीच माधुरी पती श्रीराम नेने यांच्याबरोबर ‘सकाळ’च्या स्वास्थ्यम या कार्यक्रमात सहभागी झाली होती. यावेळी तिने आपली दोन मुलं सध्या काय करतात? हे सांगितलं.
या कार्यक्रमात माधुरीला विचारलं गेलं होतं की, सध्या तुमची मुलं काय करतात? तुमच्या मुलांचं संगोपन तुम्ही कसं करता? जनरेशन गॅप जाणवते का? यावर माधुरी म्हणाली, “मुलं कोणत्या गोष्टीत हुशार आहेत? हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुमच्या विचारांप्रमाणे त्याची हुशारी नसेल तर ठीक आहे. कारण त्या गोष्टीत त्याला (आवडणाऱ्या गोष्टीत) रस आहे. जर ती गोष्ट त्याची आवडची झाली तर तो नक्कीच प्रयत्न करेल. कारण त्याला ती गोष्ट आवडते. तो प्रत्येक दिवशी त्यावर प्रेम करेल. जेव्हा तो सकाळी उठेल तेव्हा त्याला वाटेल मी चांगलं करतोय. त्याला हे करायला खूप आवडेल.”
पुढे माधुरी स्वतःच्या मुलांविषयी सांगताना म्हणाली, “माझ्या मुलांनी सर्व गोष्टींचा अनुभव घ्यावा असं मला वाटतं. मी त्यांना तबला शिकवला आहे, ते पियानो वाजवतात, ते गिटार वाजतात, ते ड्रम वाजवतात. पण त्याच्याबरोबर त्यांना विज्ञानात रस आहे, कला क्षेत्रामध्येही रस आहे. त्यांना चित्रपट बघायला आवडतात. आम्ही त्यांना सांगितलंय तुम्ही सर्व काही करून पाहा. माझ्या धाकट्या मुलाला कॉम्प्युटर सायन्स खूप आवडत. तो कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करतोय. मोठ्या मुलाचा कल आमच्या दोघांच्या क्षेत्रात आहे. तो सायन्स पण करतोय आणि तसंच त्याला कला क्षेत्रातही रस आहे. तो खूप चांगला म्युजिशियन आहे. त्याने नाटकाचं शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्याला अभिनय खूप आवडतो. अखेर ते दोघं काय करतील हे आम्हाला माहित नाही. पण आम्ही त्यांना सर्व गोष्टींचा अनुभव घ्यायला सांगितला आहे. कारण आम्ही त्यांना स्वातंत्र्य देण्याच्या स्थितीत आहोत. की तुम्ही करा, आम्ही पाठिंबा देतो.”
हेही वाचा – बॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक अडकला लग्नबंधनात; सलमान खानने लावली हजेरी, व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, माधुरी दीक्षित आणि तिचे पती श्रीराम नेने यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ हा मराठी चित्रपट ५ जानेवारी २०२४ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आदिनाथ कोठारेसह दिलीप प्रभावळकर, आनंद इंगळे, तेजश्री प्रधान, सतीश आळेकर, नंदिता पाटकर, दीप्ती देवी अशा तगड्या कलाकार मंडळींची मांदियाळी आहे.