बॉलीवूड अभिनेत्री मलायका अरोरा व अरबाज खान आपल्या लाडक्या लेकाचा म्हणजेच अरहान खानचा २१वा वाढदिवस साजरा करत आहेत. अरहान हा लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. तो सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसला तरी त्याचे मलायकाबरोबरचे नेहमी व्हिडीओ व्हायरल होत असतात. आज अरहानच्या वाढदिवसानिमित्ताने मलायकाने नुकतीच एक खास पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.
मलायका अरोराने एक व्हिडीओ शेअर करत अरहानसाठी खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मलायकाने लिहीलं आहे, “माझं छोटं बाळ आज २१ वर्षांचं झालं. माझी तुझ्यासाठी एक साधी इच्छा आहे की, तुझे आयुष्य सर्वोत्तम जावो आणि ते तू भरभरून जगाव. हस, हसवत राहा आणि गरज असल्यास रड..जितकी मेहनत करतोस तितकाच खेळ आणि प्रामाणिक राहा. ज्या लोकांवर आणि गोष्टींवर प्रेम करतोस त्यांना वेळ दे, त्यांच्यासाठी वेळ काढ. उत्तम झोप आणि चांगली स्वप्न बघ. तुझ्या चेहऱ्यावर नेहमी स्मितहास्य ठेव. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा माझ्या गोड मुला. तुझ्यावर आई सर्वात जास्त प्रेम करते. तुझा तिला खूप अभिमान आहे.”
मलायकाच्या या पोस्टवर बॉलीवूड सेलिब्रिटींसह तिच्या चाहत्यांनी अरहानला शुभेच्छा दिल्या आहेत. करिष्मा कपूर, दिया मिर्झा, अमृता राव, संजय कपूर अशा अनेक सेलिब्रिटींनी अरहानला २१व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.