सिनेसृष्टीत असे बरेच कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आपल्या कुटुंबाचा विरोध पत्करून अभिनयाची आवड जोपासली आहे. त्यापैकी एक म्हणजे बोल्ड, मादक अभिनेत्री मल्लिका शेरावत. एकेकाळाची बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून हिला ओळखलं जातं होतं. मल्लिका शेरावतच्या हॉटनेसने तरुणांना अक्षरशः वेड लावलं होतं. मल्लिका जितकी बोल्ड, हॉट अंदाजामुळे चर्चेत होती, तितकीच ती तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे देखील चर्चेत राहिली. अशा या बहुचर्चित अभिनेत्रीचा आज वाढदिवस. याचनिमित्ताने आज आपण तिचा बॉलीवूड ते हॉलीवूड पर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२४ ऑक्टोबर १९७६ ला हरियाणातील हिसार जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात रीमा लांबाचा जन्म झाला. आता ही रीमा लांबा कोण? असा प्रश्न पडला असेल. तर ही रीमा लांबा म्हणजेच मल्लिका शेरावत. सिनेसृष्टीत आल्यानंतर रीमाची मल्लिका झाली. मल्लिकाने दिल्ली विद्यापीठातील प्रसिद्ध मिरांडा हाऊस महाविद्यालायामध्ये तत्त्वज्ञानाची पदवी घेतली आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांवर तिचा खूप विश्वास आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला. पण तिचा हा निर्णय घरच्या काही मान्य नव्हता. वडील खूप नाराज झाले होते. “सिनेसृष्टीत काम करायचं असेल तर कुटुंबाच आडनाव लावायचं नाही आणि आमच्याशी तुझा कुठलाही संबंध ठेवायचा नाही”, असं स्पष्टपणे मल्लिकाच्या वडिलांनी सांगितलं होतं. एवढं सगळं होऊनही मल्लिका आपल्या निर्णयावर ठाम होती. त्यामुळे तिने कुटुंबाचा विरोध झुगारून वयाच्या १९-२०व्या वर्षी घर सोडलं अन् स्वप्नपूर्ण करण्यासाठी स्वप्नगरी मुंबई गाठली.

हेही वाचा – इच्छा होती वैमानिक आणि डॉक्टर होण्याची, झाला विचारी अभिनेता; गुड्डू पंडित फेम अली फजलची भरारी

मुंबईत येताच करिअरच्या सुरुवातीला मल्लिकाला बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली. तिची ही पहिली जाहिरात होती. त्यानंतर तिला बॉलीवूडचा बादशाह म्हणजे शाहरुख खानसह दुसऱ्या जाहिरातीमध्ये काम मिळालं. अशाप्रकारे मल्लिकाने अभिनय क्षेत्रातील करिअरला जोरदार सुरुवात केली. त्यानंतर ती म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली. २००३ साली ‘ख्वाहिश’ या चित्रपटातून मल्लिकाने बॉलीवूडमध्ये खऱ्या अर्थी दमदार पदार्पण केलं. कारण या चित्रपटात तिने अभिनेता हिमांशू मल्लिकला १७ वेळा चुंबन केलं, ही गोष्ट चांगलीच लक्षवेधी ठरली. यापूर्वी ती २००२ साली ‘जीना सिर्फ मेरे लिए’ या चित्रपटात झळकली होती. पण या चित्रपटातील तिची छोटी भूमिका होती. त्यामुळे १७ वेळा चुंबन करत ‘ख्वाहिश’ या चित्रपटातूनच मल्लिकाचं बॉलीवूडमध्ये पदार्पण झाल्याचं बोललं जातं. त्यानंतर ती एका चित्रपटामुळे रातोरात स्टार झाली. तो चित्रपट म्हणजे २००४ साली प्रदर्शित झालेला ‘मर्डर’.

महेश भट्ट व मुकेश भट्ट निर्मित ‘मर्डर’ या चित्रपटामुळे मल्लिका अधिकच प्रसिद्धीच्या झोतात आली. या चित्रपटात इमरान हाश्मीबरोबर केलेले बोल्ड सीन, चुंबन सीन यामुळे बॉलीवूडमध्ये तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली. त्यानंतर ती ‘किस किस की किस्मत’, ‘बचके रेहना रे बाबा’, ‘प्यार के साइट इफेक्ट्स’, ‘शादी से पेहले’, ‘गुरू’, ‘अगली और पगली’, ‘वेलकम’, ‘हिस्स’, अशा अनेक चित्रपटात तिच्या भूमिका पाहायला मिळाल्या. या चित्रपटातील तिच्या बोल्ड अदाकारीने अक्षरशः तरुणांना वेड केलं.

हेही वाचा – अपघातामुळे वजन गेलं शंभरीपार.. अलका कुबल यांनी कशी केली त्यावर मात? जाणून घ्या त्यांच्या आजवरच्या प्रवासाबद्दल

याच दरम्यान तिने जगातील सर्वात श्रीमंत अभिनेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जॅकी चॅन यांच्याबरोबर एका चिनी चित्रपटात काम केलं. ‘द मीथ’ असं त्या चित्रपटाचं नाव होतं. २००५ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात तिने एका भारतीय मुलीची भूमिका साकारली होती. मल्लिकाच्या हॉलीवूडच्या प्रवासातील महत्त्वाचा दुवा हे जॅकी चॅन होते. तिच्यासाठी हॉलीवूडची दारं जॅकी चॅन यांच्यामुळे उघडली गेली. त्यांनी तिला हॉलीवूडमध्ये करिअर करण्यासाठी खूप पाठिंबा दिला, असं तिनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.

पण मल्लिकावर एक अशी वेळ आली होती, ज्यावेळेस तिच्याकडून ६५ चित्रपट काढून घेतले होते. याच कारण होतं त्या चित्रपटांमधील अभिनेते. काही अभिनेत्यांना चित्रपटात स्वतःच्या गर्लफ्रेंडला भूमिका द्यायची होती, तर काही अभिनेत्यांना मल्लिकाबरोबर तडजोड करण्याची इच्छा होती. पण अभिनेत्रीने याला साफ नकार दिला. त्यामुळे मल्लिकाकडून ६५ चित्रपट काढून घेण्यात आले. तरी देखील तिची बॉलीवूड आणि हॉलीवूडमधील वाटचाल सुरुच होती. बऱ्याच जणांना माहित नसेल, मल्लिकाने आमिर खानच्या लोकप्रिय चित्रपट ‘दंगल’साठी ऑडिशन दिली होती. आमिरच्या पत्नीच्या भूमिकेसाठी तिने ऑडिशन दिली होती; जी निर्मात्यांना खूप आवडली. पण आमिरला मात्र पटलं नाही. चार मुलींची आई मल्लिका वाटणार नाही, असं स्पष्ट मत आमिरने मांडलं. त्यामुळे मल्लिकाची ‘दंगल’ चित्रपटात काम करण्याची संधी हुकली.

हेही वाचा – वडिलांच्या भीतीमुळे बँकेत नोकरी ते बॉलीवूडमध्ये पदार्पण, असा आहे सोहा अली खानचा प्रवास

लेखक, निर्माता, दिग्दर्शक आणि अभिनेता रजत कपूरच्या ‘आर के/आरके’ या चित्रपटात मल्लिका शेवटची दिसली होती. बऱ्याच काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याचा प्रयत्न तिने ‘आर के/आरके’ चित्रपटातून केला होता. पण मल्लिकाचा हा प्रयत्न अयशस्वी झाला. या चित्रपटाला पाहिजे तसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. या संपूर्ण प्रवासात मल्लिकावर बऱ्याच केस करण्यात आल्या. कधी तिच्या कपड्यांविरोधात तर कधी तिच्या चित्रपटातील भूमिकेविरोधात केस करण्यात आल्या होत्या. पण तरीही मल्लिका काही डगमगली नाही. तिने तिच काम सुरुच ठेवलं.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress mallika sherawat birthday special her bollywood to hollywood journey pps
First published on: 24-10-2023 at 10:29 IST