अभिनेत्री नीना गुप्ता यांची चित्रपटातील सेकंड इनिंग ही जोरदार सुरू आहे. ‘बधाई हो’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर नीना गुप्ता या बऱ्याच चित्रपटात झळकल्या. त्यांच्या अभिनयाचीसुद्धा चांगलीच प्रशंसा झाली. नीना गुप्ता यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या. नुकतंच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘उंचाई’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली.
नीना गुप्ता या अभिनयाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीमुळेसुद्धा चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांचं आत्मचरित्र ‘सच कहो तो’ यालादेखील प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या पुस्तकात त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनुभवांबद्दलही वक्तव्य केलं आणि क्रिकेटपटू विवयन रिचर्ड आणि मुलगी मसाबा हीच्याबद्दलही बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. विवियन रिचर्डपासून वेगळं झाल्यानंतर विवेक मेहरा यांच्याशी लग्न केलं आणि नव्या प्रवासाला सुरुवात केली.
आणखी वाचा : “वेब सिरीजमध्ये शिव्या देण्याला माझा विरोध नाही पण…”; राज ठाकरेंचं OTT सेन्सॉरशिपवर रोखठोक मत
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार एका मुलाखतीमध्ये नीना गुप्ता यांनी त्यांच्या याच नात्याबद्दल खुलासा केला आहे. विवेक मेहरा यांच्या पहिल्या भेटीबद्दल नीना म्हणाल्या, “माझं विमानाशी एक अनोखं नातं आहे. विवेक यांना मी प्रथम प्रवासादरम्यान विमानातच भेटले. तो आमच्या आयुष्यातील एक सुंदर काळ होता. शिवाय विवेक यांचं लग्न झालेलं असून त्यांना २ मुलंदेखील होती, त्यामुळे हे पचवणं थोडं कठीण होतं.”
याच मुलाखतीमध्ये पुढे बोलताना नीना म्हणाल्या, “मुलांबद्दल माझ्या मनात प्रचंड प्रेम आहे, त्यांच्यासाठी मी काहीही करू शकते. मी माझ्या पतीसाठीही बऱ्याच गोष्टी करते, पण पतीसाठी मी काहीही करू शकत नाही, तिथे काही बंधनं येतात. जसं मी मसाबासाठी काहीही करू शकते तसं माझ्या पतीसाठी मी करू शकत नाही.” अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’बरोबरच नीना या ‘गुडबाय’ या चित्रपटातही झळकल्या होत्या.