अभिनेत्री नीना गुप्ता यांची चित्रपटातील सेकंड इनिंग ही जोरदार सुरू आहे. ‘बधाई हो’ या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर नीना गुप्ता या बऱ्याच चित्रपटात झळकल्या. त्यांच्या अभिनयाचीसुद्धा चांगलीच प्रशंसा झाली. नीना गुप्ता यांच्या भूमिका लोकांच्या पसंतीस उतरल्या. नुकतंच त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘उंचाई’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली.
नीना गुप्ता या अभिनयाबरोबरच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील घडामोडीमुळेसुद्धा चर्चेत असतात. मध्यंतरी त्यांचं आत्मचरित्र ‘सच कहो तो’ यालादेखील प्रेक्षकांनी चांगलाच प्रतिसाद दिला. या पुस्तकात त्यांनी चित्रपटसृष्टीतील अनुभवांबद्दलही वक्तव्य केलं आणि क्रिकेटपटू विवयन रिचर्ड आणि मुलगी मसाबा हीच्याबद्दलही बऱ्याच गोष्टी स्पष्ट केल्या आहेत. नुकतंच त्यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना या प्रवासाबद्दल खुलासा केला आहे.
आणखी वाचा : “मी बिग बॉसमध्ये जायचा विचार करेन पण…” ‘शार्क टँक इंडिया १’ गाजवणाऱ्या अशनीर ग्रोव्हरचा खुलासा
मसाबाच्या पालनपोषणाविषयी बोलताना नीना गुप्ता म्हणाल्या, “मी एका टिपिकल आईसारखी होते. माझ्या घरी माझे मैत्र मैत्रिणी भेटायला आले की मी त्यांच्यासमोर मसाबाच्या लहानपणीचे फोटो काढून बसायचे किंवा तिला एखादी कविता म्हणून दाखवायला सांगायचे. त्या पाहुण्यांना त्यात काडीचाही रस नव्हता पण तरी मी या गोष्टी करायचे. माझ्या मुलांना मी सदैव पुढे केलं, मला वाटतं प्रत्येक आई हेच करते, आणि तिचं लग्न लावून देणं ही मातृ प्रवृत्तीच आहे असं मला वाटतं.”
याच मुलाखतीमध्ये लग्न आणि घटस्फोट याबाबत नीना गुप्ता यांनी त्यांचं मत मांडलं. नीना म्हणाल्या, “आपल्या आसपास आजकाल लग्नाला नावं ठेवणारी बरीच लोक आढळतात, पण माझ्यासाठी ती अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. शिवाय याला अजूनतरी कोणती पर्यायी संस्था किंवा संस्कार नाहीत. आजच्या तरुण मुली या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि सक्षम आहेत, त्या मुलांकडून एकही रुपया घेत नाहीत. यामुळेच घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. आधी मुलीकडे निमूटपणे सगळं सहन करण्याशिवाय दूसरा पर्याय नव्हता, पण माझा लग्नसंस्थेवरही गाढा विश्वास आहे.” अमिताभ बच्चन यांच्या ‘उंचाई’बरोबरच नीना या ‘गुडबाय’ या चित्रपटातही झळकल्या होत्या. आता नीना गुप्ता संजय मिश्रा यांच्याबरोबर ‘वध’ या चित्रपटात झळकणार आहेत.