Bollywood Actress Nora Fatehi Attend Wedding Function Ratnagiri : अलीकडच्या काळातील सेलिब्रिटी सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असतात. कलाविश्वात नशीब आजमवण्यासाठी जसा आपल्या कुटुंबाचा भक्कम पाठिंबा हवा, अगदी त्याचप्रमाणे या सेलिब्रिटींना सतत साथ देणारी स्वत:ची टीम देखील महत्त्वाची असते. विशेषत: बॉलीवूडमध्ये सक्रिय असणाऱ्या प्रत्येक कलाकारासाठी त्याची टीम पडद्यामागून मेहनत घेत असते. अनेकवर्षे एकत्र काम केल्यावर या टीममधले सहकारी सेलिब्रिटींना कुटुंबाप्रमाणे वाटतात.
याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर, सलमान खान आणि त्याचा बॉडीगार्ड शेरा… या दोघांचं नातं आता अगदी सख्ख्या भावांप्रमाणे झालेलं आहे. अगदी याचप्रमाणे एका बॉलीवूड अभिनेत्रीने जवळपास ८ वर्षे तिच्याबरोबर काम करणाऱ्या सहकाऱ्याला आपला भाऊ मानलं आहे. म्हणूनच त्याच्या लग्नासाठी या अभिनेत्रीने कोकण प्रवास केल्याचं पाहायला मिळालं. तिचं नाव आहे नोरा फतेही.
अभिनेत्री कोकणी पाहुणचार पाहून भारावली
नोरा फतेही हिंदी ‘बिग बॉस’च्या नवव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती. यानंतर तिने बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या नृत्याविष्काराने नेहमीच सर्वांना भुरळ पडते. नुकतीच नोरा, कोकण रेल्वेने प्रवास करत रत्नागिरीला गेली होती. तिच्याबरोबर जवळपास ८ वर्षे काम करणारा सहकारी अनुपच्या लग्नासाठी तिने रत्नागिरी गाठलं होतं. याचा मिनी ब्लॉग अभिनेत्रीने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
रत्नागिरी स्थानकावर अनुप व त्याच्या कुटुंबीयांनी नोराचं मोठ्या आनंदाने स्वागत केलं. यानंतर नोरा पिवळ्या रंगाची भरजरी साडी नेसून अनुपच्या हळदीला पोहोचली. तिच्यासाठी खास पुरी-भाजी आणि वरण-भाताचा बेत करण्यात आला होता. यानंतर अनुपच्या घरच्यांनी नोराचा अगदी कोकणी पद्धतीने आहेरात साडी देऊन पाहुणचार केला. हे सगळं आदरातिथ्य पाहून नोरा खूपच आनंदी झाली होती.
अभिनेत्रीचा ( Bollywood Actress ) हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. “नोरा तू खरंच खूप चांगली आहेस”, “नोरा एकदम स्वीटहार्ट मुलगी आहे”, “जराही आविर्भाव न बाळगता नोरा त्यांच्या घरात वावरलीये… वाह सुंदर”, “आपल्या सहकाऱ्यासाठी तू जे काही केलंस, ते खूपच प्रशंसनीय आहे” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर दिल्या आहेत.