हमास या इस्लामी कट्टरवादी गटाने शनिवारी अचानक इस्रायलवर हल्ला केल्यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. या हल्लानंतर इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने आता गंभीर रुप धारण केलं आहे. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आहे. अशी युद्धजन्य परिस्थिती असताना बॉलीवूडची अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. पण तिला काल (८ ऑक्टोबर) सुखरुपरित्या भारतात परत आणण्यात आलं. सध्या नुसरतचा इस्रायलवर हल्ला होण्यापूर्वीच एक व्हिडिओ समोर आला आहे.
हेही वाचा – “आपल्या इतिहासात चंदन अन् कोळसा आहे, मी… ” दिग्पाल लांजेकरांचं ‘ते’ वक्तव्य चर्चेत, म्हणाले…
अभिनेत्री नुसरत भरुचा ही इस्रायलला हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेली होती. इथे तिच्या ‘अकेली’ चित्रपटाचा प्रीमियर होता. या चित्रपटाची कथाच नुसरतने काहीशी वास्तवात अनुभवली. ‘अकेली’मध्ये तिने ज्योती नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे, जी इराकमध्ये अडकते. ज्योती आपल्या मायदेशी परतण्यासाठी खूप धडपड करते. पण यावेळी तिला दहशतवाद्यांचा अत्याचारांना सामोरे जाव लागतं. चित्रपटात ज्याप्रमाणे ज्योती इराकमध्ये अडकते, तशीच नुसरत इस्रायलमध्ये अडकली होती. पण सुदैवाने नुसरत मायदेशी सुखरुप परतली.
इस्रायलवर हल्ला होण्यापूर्वीचा नुसरत भरुचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवमधील हा व्हिडीओ असून यामध्ये नुसरत ‘अकेली’ चित्रपटातील सहाय्यक कलाकारांबरोबर ‘तेरे जैसा यार कहां’ हे गाणं गाताना दिसत आहे.
हेही वाचा – Video: ११ महिन्यांनंतर आलिया भट्ट-रणबीर कपूरच्या लेकीची पहिली झलक, पाहा राहाचा व्हिडीओ
दरम्यान, इस्रायलवरील हल्ल्यानंतर नुसरतची टीम तिच्याबरोबर संपर्क साधण्यासाठी खूप प्रयत्न करत होती. कारण शनिवारी दुपारी १२.३०ला तिच्याशी शेवटचा संपर्क झाला होता. तेव्हा ती बेसमेंटमध्ये सुरक्षित होती. पण तेव्हापासून नुसरतशी संपर्क होत नव्हता. त्यामुळे चिंता वाढली होती. मात्र काही काळानंतर नुसरतशी संपर्क झाला आणि ती सुरक्षित असल्याच समोर आलं. रविवारी ती सुखरुप भारतात परतली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर इस्रायलमधल्या परिस्थितीची भीषणता दिसून येत होती. नुसरत खूप भावुक झाली होती. “मला थोडा वेळ द्या,” असं तिनं मीडियाला यावेळी सांगितलं.