७० च्या दशकात फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करणाऱ्या अभिनेत्री म्हणजे पूनम ढिल्लों होय. पूनम यांनी १५ व्या वर्षी पहिला चित्रपट केला होता. १९७८ साली मिस यंग इंडिया स्पर्धा जिंकणाऱ्या पूनम यांनी ‘त्रिशूल’मध्ये काम केलं होतं. त्या सिनेमात पाहिल्यावर यश चोप्रा यांनी त्यांना ‘नूरी’ सिनेमात मुख्य भूमिका दिली. हा चित्रपट हिट झाला आणि पूनम स्टार झाल्या. यानंतर त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमे केले.

पूनम ढिल्लों यांचं करिअर यशस्वी राहिलं असलं तरी वैयक्तिक आयुष्यात मात्र बरेच चढ-उतार आले. त्यांनी लग्न केलं, पण काही वर्षांनी पतीबरोबर मतभेद झाले. पतीच्या अफेअरबद्दल समजताच त्यांनीही अफेअर केलं आणि मग जे घडलं, त्यानंतर पूनम यांनी पतीचं घर सोडलं.

पूनम ढिल्लों-अशोक ठकारियांची पहिली भेट

पूनम ढिल्लों व अशोक ठकारिया यांची भेट १९८८ साली झाली होती. त्यावेळी पूनम यांचं राज सिप्पी यांच्याशी ब्रेकअप झालं होतं. याचदरम्यान त्यांच्या वडिलांचं निधन झाल्याने त्यांना धक्का बसला. याच काळात अशोक ठकारिया यांनी त्यांनी सावरलं. दोघांमधील जवळीक वाढली आणि नंतर त्यांनी लग्न केलं.

संसारात रमल्या पूनम ढिल्लों

अशोक ठकारिया व पूनम ढिल्लों यांचं वैवाहिक आयुष्य सुरळीत चाललं होतं. पूनम संसारात रमल्या, तर अशोक कामात व्यग्र झाले. काही काळाने पूनम यांनी आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला. पूनम नंतर कामावर परतल्या नाही. नंतर त्यांना दुसरी मुलगी झाली. पूनम यांच्या मुलाचे नाव अनमोल व मुलीचे नाव पलोमा आहे.

…अन् पूनम यांनी सोडलं पतीचं घर

लग्नानंतर काही वर्षांनी पूनम ढिल्लों आणि अशोक ठकारिया यांच्यात मतभेद सुरू झाले. पूनम यांना वाटलं की त्यांच्या वैवाहिक आयुष्यात आता रोमान्स उरलेला नाही. पतीला कुटुंबासाठी वेळ नसल्याची त्यांची तक्रार होती. मतभेद वाढत गेले आणि पूनम यांनी घटस्फोट घ्यायचं ठरवलं. १९९७ मध्ये पूनम आपल्या दोन्ही मुलांसह पतीचे घर सोडून माहेरी निघून गेल्या आणि घटस्फोटासाठी त्यांनी वकिलांना भेटायला सुरुवात केली.

पतीला धडा शिकवायला अफेअर केलं अन्…

पूनम घटस्फोटाच्या विचारात असताना अशोक ठकारिया कुणाला तरी डेट करू लागले. घटस्फोट न घेता त्यांचं अफेअर सुरू झालं, यामुळे पूनम भडकल्या. पतीला धडा शिकवायला त्यांनी किकू नावाच्या विदेशी व्यक्तीशी अफेअर केलं. यामुळे दोघांच्या नात्यात सुधारणा होण्याऐवजी सगळं बिनसलं आणि त्यांचा घटस्फोट झाला.

पूनम ढिल्लों यांनी दुसरं लग्न का केलं नाही?

पूनम यांनी दोन्ही मुलांचा सांभाळ केला, पण दुसरं लग्न केलं नाही. “दुसरं लग्न अजिबात करायचं नाही. मी कधीच याबद्दल विचारही केला नाही. मला कोणी असं भेटलंच नाही ज्याला मी माझ्या दोन मुलांपेक्षा जास्त महत्त्व देईन. माझी प्राथमिकता माझी मुलं होती. पालकत्व किंवा इतर कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत कोणीतरी माझ्या घरी विशिष्ट मूल्ये घेऊन येत नाही तोपर्यंत, मी विचलित होणार नाही. मी खूप लोकांना भेटले, ते मला आवडले. पण एकतर ते टिकू शकले नाही किंवा त्यांच्यात जोडीदाराचे गुण नव्हते,” असं पूनम ढिल्लों पिंकव्हिलाशी बोलताना म्हणाल्या होत्या.