ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री पूनम ढिल्लों (Poonam Dhillon) यांनी त्यांच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमे केले. ८०-९० च्या दशकात त्यांनी बॉलीवूड गाजवलं. आघाडीच्या अभिनेत्यांबरोबर काम केलं. पूनम ढिल्लों यांनी एकदा एका दिग्गज अभिनेत्याबरोबर काम केल्यावर त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या आश्चर्यकारक वक्तव्याची खूप चर्चा झाली होती. कोण होते ते अभिनेते? जाणून घेऊयात.
पूनम ढिल्लों यांनी १९७८ मध्ये मिस यंग इंडियाचा खिताब जिंकला होता. ही सौंदर्य स्पर्धा जिंकल्यावर त्यांना अभिनयाची पहिली संधी यश चोप्रा यांनी दिली. ‘नूरी’ हा पूनम ढिल्लों यांचा पहिला चित्रपट. या चित्रपटात त्यांच्याबरोबर फारूक शेखदेखील होते. या चित्रपटातील पूनम ढिल्लों यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं. हा चित्रपट सुपरहिट ठरल्यावर पूनम यांनी ‘त्रिशूल’, ‘सोहनी महिवाल’ ‘तेरी मेहरबानियां’, ‘कर्मा’ यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
पूनम ढिल्लोंनी ऑनस्क्रीन वडिलांशी लग्न करण्याची व्यक्त केलेली इच्छा
पूनम ढिल्लों यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक अभिनेत्यांबरोबर काम केलं. ‘लैला’ चित्रपटात त्यांनी दिग्गज अभिनेते सुनील दत्त यांच्याबरोबर स्क्रीन शेअर केली होती. या सिनेमात सुनील दत्त यांनी पूनम यांच्या वडिलांची भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या शूटिंगचा एक मजेदार किस्सा पूनम यांनी सांगितला होता. एकदा पूनम यांनी गमतीत सुनील दत्त (Sunil Dutt) यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली होती. “तुम्ही तरुण असता तर मी तुमच्याशी लग्न केलं असतं,” असं पूनम ढिल्लों सुनील दत्त यांना म्हणाल्या होत्या.
पूनम ढिल्लों यांचं वैयक्तिक आयुष्य
पूनम ढिल्लों यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांनी अशोक ठकेरिया यांच्याशी प्रेमविवाह केला होता. अशोक ठकेरिया हे चित्रपट निर्माते होते. दोघांनी १९८८ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर पूनम यांनी इंडस्ट्रीतून ब्रेक घेतला. त्यांना अनमोल व पलोमा ही दोन अपत्ये झाली. पूनम संसारात, मुलांमध्ये रमल्या तर अशोक ठकेरिया कामात व्यग्र झाले. अशोक आपल्याला वेळ देत नसल्याची पूनम यांची तक्रार होती. याचदरम्यान दोघांमध्ये मतभेद वाढले. अखेर दोघे विभक्त झाले. पूनम यांनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलं नाही. त्या आपल्या मुलांबरोबर राहतात.