बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने आजवर अनेक हिंदी चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. हिंदीबरोबरच ती हॉलीवूडच्याही अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. प्रियांका चोप्रा केवळ आपल्या सशक्त अभिनयामुळेच नाही, तर ती एका वेगळ्या विचारसरणीसाठीही ओळखली जाते. आपल्या वडिलांच्या निधनानंतर अभिनेत्रीने केलेल्या एका कृतीमुळे ती चर्चेत आली होती. वडील अशोक चोप्रा यांच्या निधनानंतर सहाव्या दिवशी अभिनेत्री प्रियांकाने आपल्या आईचा वाढदिवस साजरा केला होता. अशोक चोप्रा यांच्या मृत्यूनंतर लेकीने अशा प्रकारची वाढदिवसाची पार्टी आयोजित केल्याबद्दल अनेक जण तिच्यावर नाखूश होते. त्याबद्दल स्वत: प्रियांकाच्या आईने वक्तव्य केले आहे. प्रियांकाच्या आईने अलीकडेच ‘लेहरें रेट्रो’शी बोलताना याबद्दल सांगितले.
यावेळी मधू चोप्रा यांनी असे म्हटले, “त्यांचे (अशोक चोप्रा) १० जून रोजी निधन झाले आणि माझा वाढदिवस १६ जून रोजी आहे. मी ६० वर्षांची होणार होते आणि त्यामुळे प्रियांकानं माझ्यासाठी एक मोठी पार्टी आयोजित केली होती. अशोक चोप्रा यांच्या आजारामुळे संपूर्ण कुटुंब तिथे आधीच उपस्थित होते. त्यांच्या निधनानंतर आम्ही सर्व जण दु:खात होतो; पण प्रियांका माझ्या वाढदिवसाची पार्टी करणार यावर ठाम होती आणि त्यामुळे तिनं सर्वांना तिथेच थांबण्यास सांगितलं. तसेच, ती सर्वांना ‘पप्पांनाही हेच हवं होतं’, असंही म्हणाली होती.”
पुढे मधू चोप्रा यांनी सांगितले, “प्रियांकाचं असं म्हणणं होतं की, तिच्या आईनं प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा आणि म्हणूनच तिनं माझ्या वाढदिवसानिमित्त डीजे आणि संगीतासह एक पार्टी आयोजित केली. त्यावर कुटुंबातील इतर सदस्य खूश नव्हते. त्यावरून ते माझ्याबद्दल ‘हिच्याकडे पाहा. हिला पतीच्या मृत्यूबद्दल अजिबात दुःख नाही’, असं म्हणाले होते. तर दुसरीकडे मी विचार करीत होते की, माझ्या मुलीनं माझ्यासाठी हे सर्व केलं आहे आणि माझ्या मुलांनी माझ्यासाठी खूप कष्ट केले आहेत.”
त्यानंतर मधू चोप्रा म्हणाल्या, “हे सगळं पाहून माझ्या मनात हे चाललं होतं की, सर्व जण दुःखात होते; पण माझी मुलगी तिच्या वडिलांचा आदर करीत होती. त्याबद्दल ती सर्वांना म्हणाली होती की, मी केवळ पप्पांना जे हवं होतं, तेच करीत आहे. त्यामुळे तुम्हीही तेच केलं, तर बरं होईल”. दरम्यान, प्रियांका चोप्राचे वडील डॉ. अशोक चोप्रा यांचे कर्करोगामुळे २०१३ मध्ये निधन झाले. अशोक चोप्रा हे भारतीय सैन्यात डॉक्टर होते. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.