Priyanka Chopra Viral Video : बॉलीवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. आगामी प्रोजेक्ट्स आणि भावाच्या लग्नामुळे प्रियांका भारतात आली होती. सिद्धार्थ चोप्राचं लग्न करून ती कामानिमित्ताने हैदराबादला गेली होती. हे काम झाल्यानंतर आज, १९ फेब्रुवारीला प्रियांका चोप्रा लेक मालतीबरोबर लॉस एंजेलिसला तिच्या घरी रवाना झाली. याच प्रवासातील प्रियांकाच्या दोन व्हिडीओंनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओमधील तिच्या कृतीने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. प्रियांकाने नेमकं काय केलं? जाणून घ्या…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

७ फेब्रुवारीला प्रियांका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्रा लग्नबंधनात अडकला. सिद्धार्थने अभिनेत्री नीलम उपाध्याय हिच्याशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. भावाच्या लग्नात प्रियांकाचे जबरदस्त लूक पाहायला मिळाले. मेहंदी, हळद, संगीत या कार्यक्रमामधील प्रियांकाचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. भावाचं लग्न आटोपून प्रियांका हैदराबादला गेली.

माहितीनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली आणि महेश बाबू यांच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रियांका हैदराबादला गेली होती. त्यानंतर प्रियांका मंगळवारी मुंबईत परतली. यावेळी आईच्या घरी जातानाच्या तिच्या एका कृतीची सध्या चर्चा होतं आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये सिग्नलला थांबलेल्या गाडीतून प्रियांका गरजूला मदत करताना पाहायला मिळत आहे.

आज, सकाळी प्रियांका चोप्रा लाडक्या लेकीला घेऊन लॉस एंजेलिसला रवाना झाली. यावेळी ती मुंबई विमानतळावर मालतीचे डोळे बंद करत तिला नेताना दिसत होती. तेव्हाच काही चाहत्यांनी तिला फोटो काढण्यासाठी विनंती केली. मात्र, प्रियांकाने चाहत्यांची माफी मागत माझ्याबरोबर लेक असल्याचं सांगून ती निघून गेली. अभिनेत्रीचा हा नम्रपणा पाहून नेटकरी तिचे कौतुक करत आहेत.

दरम्यान, प्रियांका चोप्रा एसएएस राजामौली यांच्या SSMB29 चित्रपटातून पुन्हा एका भारतीय सिनेसृष्टीत कमबॅक करत आहे. या चित्रपटात प्रियांका महेश बाबूबरोबर पाहायला मिळणार आहे. माहितीनुसार, प्रियांका राजामौली यांच्या चित्रपटात खलनायिकेच्या भूमिकेत झळकणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood actress priyanka chopra helps needy man on mumbai streets and apology to fan watch video viral pps