बॉलिवूडमध्ये सध्या लगीनघाई सुरू आहे. रणबीर – आलिया, अली – रिचा पाठोपाठ आता कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राही लग्नबंधनात अडकणार आहेत. नुकतीच त्यांनी कॉफी विथ करणच्या मंचावर याची कबुली दिली. पण याबरोबरच काही कलाकारांच्या लग्नाबद्दलच्या अफवाही चांगल्याच व्हायरल होत आहेत. नुकतंच जॅकी भग्नानी आणि रकुल प्रीत सिंग यांच्या लग्नाची बातमी समोर आली आणि सोशल मीडियावर याची चर्चा व्हायला सुरुवात झाली.
नुकतंच रकुलच्या वाढदिवसानिमित्त लंडनमध्ये एक पार्टी आयोजित केली गेली होती. त्याचे बरेच फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात जॅकी भग्नानीनेदेखील हजेरी लावली होती. त्यानंतर हे दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्याची बातमी समोर आली. रकुलचा भाऊ अमनने याबद्दल खुलासा केला असल्याची गोष्ट समोर आली. अमनने रकुल आणि जॅकी पुढच्यावर्षी लग्न करणार असल्याचं स्पष्ट केल्याचं बऱ्याच माध्यमांतून समोर आलं. पण रकुलने एक ट्वीट करून या बातमीमागील खरं सत्य समोर आणलं आहे.
आणखी वाचा : “समोर ज्येष्ठ नागरिक…” फोटो काढणाऱ्यांवर कियारा अडवाणी भडकली; व्हिडिओ होतोय व्हायरल
व्हायरल होणाऱ्या या बातमीची लिंक शेअर करत रकुलने आपल्या भावाला टॅग केलं आणि त्या ट्वीटमध्ये रकुल म्हणाली, “तू हे ठरवून मोकळा झालास? आणि मला सांगितलंही नाही. मलाच माझ्या आयुष्याबद्दल काही माहीत नाही ही गोष्ट किती मजेशीर आहे.” रकुलच्या या ट्वीटची सध्या चांगलीच चर्चा आहे.
तिचं हे ट्वीट पाहता या बातमीमध्ये काही तथ्य नसल्याचं स्पष्ट होत आहे. अर्थात या ट्वीटवरुन ते दोघे खरंच लग्न करणार आहेत की नाहीत हे स्पष्ट झालेलं नाही. तिने फक्त तिच्या भावाच्या वक्तव्यावर त्याला एक खोचक टोला लगावला आहे. जॅकी किंवा रकुल यापैकी कुणीच याविषयी अधिकृत स्पष्टीकरण दिलं नसल्याने त्यांचं लग्न खरंच होणार आहे की नाही हा प्रश्न अजूनही गुलदस्त्यातच आहे.