सिनेविश्वातील अनेक कलाकारांचा पदार्पणाचा सिनेमा हिट होतो, पण नंतर मात्र बरेच चढ-उतार येतात. काहींच्या करिअरमध्ये तर फ्लॉपची संख्या इतकी वाढते की त्यांचं करिअरच संपेल असं वाटतं. अशीच एक बॉलीवूड अभिनेत्री आहे, जिने करिअरमध्ये नऊ फ्लॉप चित्रपट दिले. त्यानंतर ९०० कोटींची कमाई करणारा चित्रपट नाकारला आणि राजकीय नेत्याशी लग्न केलं. लग्नानंतर तिने दमदार कमबॅक केलं. तिच्या कमबॅक सिनेमाचं आणि तिच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं.
आम्ही ज्या अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती म्हणजे प्रियांका चोप्राची चुलत बहीण परिणीती चोप्रा होय. परिणीतीने १३ वर्षांपूर्वी २०११ मध्ये ‘लेडीज वर्सेस रिकी बहल’ मधून पदार्पण केले होते. या सिनेमासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यूचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. यानंतर तिने ‘इशकजादे’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि ‘हसी तो फसी’ सारखे हिट चित्रपट दिले. परिणीती चोप्राने दावत-ए-इश्क, किल दिल, मेरी प्यारी बिंदू, नमस्ते इंग्लंडसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण हे सर्व नऊ चित्रपट फ्लॉप झाले. यानंतर परिणीतीचं करिअर संपलंय, असं बोललं जाऊ लागलं. याच दरम्यान परिणीतीने जगभरात ९०० कोटी रुपयांची कमाई करणारा ‘ॲनिमल’ चित्रपट नाकारला होता.
परिणीती चोप्राच्या करिअरसाठी हा खूप कठीण काळ होता, मात्र ती खचली नाही. तिने मेहनत सुरूच ठेवली आणि काही म्युझिक व्हिडीओ केले. याचदरम्यान तिला दिलजीत दोसांझबरोबर एक चित्रपट मिळाला आणि तिने तो चित्रपट करायचं ठरवलं. या चित्रपटासाठी शूटिंग सुरू असतानाच तिने वैयक्तिक आयुष्यात नवीन इनिंग सुरु केली. परिणीतीचे आम आदमी पार्टीचे नेता राघव चड्ढा यांच्याबरोबरचे काही फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते. त्यानंतर दोघांच्या अफेअरच्या चर्चा होऊ लागल्या. काही महिन्यांनी परिणीती व राघव यांचा साखरपुडा झाला आणि त्यांनी सप्टेंबर २०२३ मध्ये लग्न केलं. लग्नानंतर काही महिन्यांनी १२ एप्रिल २०२४ रोजी तिचा ‘चमकीला’ चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तिच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं आणि परिणीतीच्या अभिनयाचंदेखील खूप कौतुक झालं.
हेही वाचा – Video: पती अभिषेक बच्चन अन् लेकीबरोबर मुंबईत परतली ऐश्वर्या राय; मराठीत म्हणाली असं काही की…, पाहा व्हिडीओ
सध्या ३६ वर्षांची परिणीती चोप्रा तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. ती शूटिंग सेटवरील फोटो व व्हिडीओ शेअर करत असते.