बॉलीवूडचा किंग खान नेहमी चर्चेत असतो. सध्या तो त्याच्या आगामी राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ या बहुचर्चित, बहुप्रतिक्षीत चित्रपटामुळे चर्चेत आहे. तसेच सध्या शाहरुख देवदर्शन करताना दिसत आहे. अशातच किंग खानच्या धाकड्या लेकाचे म्हणजेच अबरामचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये अबरामचा अभिनय पाहायला मिळत आहे.
काल (१५ ऑगस्ट) धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता. या शाळेत अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींची मुलं शिकतात. शाहरुख खानचा छोटा मुलगा अबराम देखील या शाळेचा विद्यार्थी आहे. त्यामुळे या कालच्या कार्यक्रमातील एका नाटकात अबराम काम करताना दिसला. यासंबंधित व्हिडीओ व्हायरल झाले असून अबरामच्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
हेही वाचा – Video: सईचं सरप्राइज ते मुक्ता-सागरचा संगीत सोहळा; ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत पुढे काय घडणार पाहा…
शाहरुख खानच्या इन्स्टाग्राम फॅन पेजवर अबरामचे काही व्हिडीओ शेअर करण्यात आले आहेत. ज्यामध्ये किंग खानच्या चित्रपटातील सीन रिक्रिएट ते आयकॉनिक पोज करताना अबराम पाहायला मिळत आहे. ‘महाएसआरके’ या पेजवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये शाहरुख खानचा लेक त्यांची आयकॉनिक पोज करताना दिसत आहे. बॅकग्राउंडला ‘दिल वाले दुल्हनिया ले जायेंगे’ चित्रपटातील ‘तुझे देखा तो’ या गाण्याची म्युझिक सुरू आहे.
तसेच या व्हिडीओमध्ये ‘कल हो ना हो’ या चित्रपटातील सीन रिक्रिएट केलेला पाहायला मिळत आहे. यामध्ये शाहरुखच्या डायलॉगप्रमाणे अबराम म्हणतो, “मला मिठी मारा. मला मिठी मारायला खूप आवडत.”
लेकाचं काम पाहताना शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान आनंदी दिसत आहेत. तसेच सुहाना देखील भावाचा व्हिडीओ करताना पाहायला मिळत आहे. अबरामच्या नाटकाचे बरेच व्हिडीओ चांगलेच चर्चेत आले आहेत. त्याच्या अभिनयाचं कौतुक केलं जात आहे. एवढंच नाही तर #Abramkhan ट्रेंड होत आहे.
दरम्यान, शाहरुख खान आणि गौरी खानला तीन मुलं आहेत. मोठ्या मुलाचं नाव आर्यन आहे. तर त्यानंतरच्या मुलीचं नाव सुहाना आहे. अबराम हा शाहरुख छोटा मुलगा आहे. नुकतंच सुहानाने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवलं आहे. तिचा काही दिवसांपूर्वीच ‘द आर्चीज’ या चित्रपट प्रदर्शित झाला. आता आर्यन देखील बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. २०२४मध्ये तो बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.