झगमगत्या विश्वातील ग्लॅमरमागे सेलिब्रिटींना अनेकदा काही वाईट प्रसंगांचा सामना करावा लागतो. सिनेविश्वात स्वतःची ओळख निर्माण करताना अभिनेत्रींना अनेक अडचणींतून जावं लागतं. याबद्दल पूर्वी अभिनेत्री समोर येऊन प्रतिक्रिया देत नसत; पण आता अनेक कलाकार अशा घटनांबद्दल व्यक्त होताना दिसतात. मनोरंजन विश्वात काम करताना अनेक अभिनेत्री त्यांच्याबद्दलच्या वाईट घटनांबद्दल मत उघडपणे व्यक्त करतात. अशातच अभिनेत्री शालिनी पांडेने (Shalini Pandey) तिच्याबरोबर घडलेला वाईट अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्री शालिनी पांडेने ‘महाराज’ आणि ‘डब्बा कार्टेल’सारख्या लोकप्रिय कलाकृतींमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच एका मुलाखतीत अभिनेत्रीने एका दाक्षिणात्य दिग्दर्शकाबद्दल एक धक्कादायक किस्सा शेअर केला. चित्रपटाच्या सेटवर शालिनी आपल्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कपडे बदलत होती. तेव्हा दिग्दर्शकाने न विचारता, व्हॅनिटीमध्ये येण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगानंतर अभिनेत्रीच्या मनावर खूप परिणाम झाला. याच प्रसंगाबद्दल तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘फिल्मीज्ञान’शी बोलताना या प्रसंगाबद्दल शालिनी म्हणाली, “मी एका दक्षिण चित्रपटात काम करीत होते. तेव्हा दिग्दर्शक माझ्या व्हॅनमध्ये आला. त्यानं दार ठोठावलं नाही आणि मी कपडे बदलत होते. तो थेट दार उघडून आत आला. तेव्हा मी २२ वर्षांची होते. मी घाबरले आणि त्याच्यावर ओरडले. माझ्याबरोबर हे असं काही घडेल असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी लोकांना रागावलेल्या व्यक्तीसारखी दिसत असे. पण, स्वतःचं रक्षण करण्यासाठी मला काही गोष्टी कराव्या लागल्या.”
पुढे तिने म्हटले, “मी माझ्या कारकिर्दीत फक्त चांगल्या पुरुषांबरोबरच काम केलं आहे, असं नाही. मी माझ्या आयुष्यात अनेक वाईट पुरुषांबरोबरही काम केलं आहे. माझ्या कुटुंबातील कुणीही या क्षेत्रातलं नाही. त्यामुळे अशा परिस्थितींना कसं सामोरं जायचं हे माहीत नव्हतं. इथे लोक सहसा तुम्हाला खूप गोड राहायला सांगतात. नाही तर काम मिळणार नाही.”
त्यानंतर तिने पुढे असेही म्हटले, “दिग्दर्शकानं दार न ठोठावता, माझ्या व्हॅनिटीमध्ये प्रवेश केल्याबद्दल मी त्याच्यावर ओरडले होते. त्याबद्दल मला सेटवरील माझ्या इतर सहकलाकारांनी सांगितले होते की, मी दिग्दर्शकावर ओरडायला नको होतं; पण हे चूक होतं. मी नवीन असल्यानं व्हॅनिटीच्या आत येताना दार ठोठावलं नाही हे चूक आहे. तसं माझ्याबरोबर कोणी वागू शकत नाही.”
दरम्यान, अभिनेत्री शालिनी पांडेच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची महाराज या चित्रपटात दिसली होती. आमिर खानचा मुलगा जुनैद खानबरोबर तिने अभिनय केला होता. त्यानंतर आता अभिनेत्री एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनेत्री लवकरच धनुषबरोबर ‘इडली कढाई’ चित्रपटात दिसणार आहे. सध्या ती याच चित्रपटाच्या तयारीत आहे.