अभिनेता पुलकित सम्राटची पहिली पत्नी व बॉलीवूड अभिनेत्री श्वेता रोहिरा हिचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला. भीषण अपघातात श्वेता गंभीर जखमी झाली आहे. तिने रुग्णालयातील फोटो शेअर करून तिच्या अपघाताबद्दल माहिती दिली होती. आता श्वेताला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. श्वेता घरी परत आली आहे, पण तिची अवस्था पाहून चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
श्वेताने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या हातात पुष्पगुच्छ दिसत आहेत. श्वेताच्या चाहत्यांनी व मित्र-मैत्रिणींनी तिला हे पुष्पगुच्छ पाठवले आहेत. श्वेताने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या ओठावर जखम दिसतेय, तसेच तिच्या मानेला पट्टा आणि पायावर प्लास्टर दिसत आहे.
“माझ्यापर्यंत पोहोचणारे प्रत्येक फूल फक्त त्याचा सुगंधच नाही तर प्रार्थना, प्रेमाचा मेसेज आणि आशाघेऊन येत आहे. ते मला आठवण करून देतात की सर्वात नाजूक पाकळ्या देखील वादळांना तोंड देतात,” अशा आशयाचं कॅप्शन श्वेताने या पोस्टला दिलं आहे. “आयुष्य जगण्याच्या दोन पद्धती आहेत. पहिली जे होतंय ते होऊ द्या किंवा मग ते बदलण्याची जबाबदारी उचला,” असं श्वेताने लिहिलं आहे. हा कठीण काळही निघून जाईल, या परिस्थितीत हार मानणार नसल्याचं श्वेता म्हणतेय.
पाहा पोस्ट
काही दिवसांपूर्वी झाला श्वेताचा भीषण अपघात
श्वेताने २८ जानेवारीला इन्स्टाग्रामवर दोन फोटो पोस्ट करून तिच्या अपघाताबद्दल सांगितलं होतं. हाडं मोडली आणि ओठ चिरल्याचं तिने पोस्टमध्ये लिहिलं होतं. “आयुष्य चढ-उतारांनी भरलेले आहे. तुम्ही ‘कल हो ना हो’ गुणगुणत असता, दिवसभर काय करायचे याचे नियोजन करत असता? पुढच्याच क्षणी आयुष्य या वाटेवर एक दुचाकी पाठवतं. माझी काहीच चूक नव्हती, तरीही चालता-चालता मी अचानक खाली पडले,” असं श्वेताने म्हणाली होती.
“जखमा, मोडलेली हाडं, किती तरी तास अंथरुणात पडून…या सगळ्याची मी कल्पनाही केली नव्हती. पण कदाचित युनिव्हर्सला वाटलं की मला संयमाचा धडा शिकवण्याची गरज आहे. मी हॉस्पिटलच्या नाटकात स्वतःच्या मिनी सोप ओपेरात अभिनय करावा अशी त्याची इच्छा होती. अनेक वेळा आयुष्य आपल्याला अशा प्रसंगांमधून मजबूत बनवते. मला माहीत आहे की हे फक्त एक चॅप्टर आहे, पूर्ण कहाणी नाही,” असं श्वेताने रुग्णालयातून शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिलं होतं.