बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेनला काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. सुश्मिताने तिच्या सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत ही माहिती दिली होती. तिच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करत काळजी घेण्यास सांगितलं होतं. सुश्मिताला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच तिच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत होती. आता खुद्द सुश्मितानेच तिच्या प्रकृतीबद्दल समोर येऊन माहिती दिली आहे.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुश्मिताने चाहत्यांसाठी इन्स्टाग्राम लाइव्ह केलं होतं. या लाइव्हद्वारे चाहत्यांशी संवाद साधत तिने प्रकृतीबद्दल माहिती दिली. सुश्मिता अजूनही पूर्णपणे बरी झालेली नाही. परंतु, हळूहळू प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती अभिनेत्रीने दिली आहे. सुश्मिताच्या घशाला इन्फेक्शनही झालं असल्याने लाइव्हमध्ये तिला बोलण्यासही त्रास जाणवत होा. प्रकृतीबाबत माहिती देताना सुश्मिता म्हणाली, “माझ्या घशाला इन्फेक्शन झाल्यामुळे आवाज असा येत आहे. पण काळजी करण्याचं कारण नाही. गेल्या दोन दिवसात तुम्ही माझ्याप्रती व्यक्त केलेली काळजी व प्रेम पाहून मी भारावून गेली आहे. मी स्वत:ला भाग्यवान समजते की तुम्ही माझ्यावर इतकं प्रेम करता. मी आता बरी आहे. हळूहळू माझ्या प्रकृतीत सुधारणा होत आहे”.
हेही वाचा>> सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका आल्याचं समजताच अभिनेत्रीची वहिनी चिंतेत, म्हणाली, “दीदी तुम्ही…”
“अनेकांना या परिस्थितीतून जावं लागतं. कोणाबरोबर काही ना काही वाईट घडत असतं. पण मला मिळालेले प्रेम सगळ्यांनाच मिळतं असं नाही. तुमच्या प्रार्थना व प्रेमामुळे आज मी बरी होत आहे. यासाठी मी तुमची आभारी आहे”, असंही सुश्मिता म्हणाली. सुश्मिताने या लाइव्हमधून तिचे कुटुंबीय, निकटवर्तीय व डॉक्टरांचेही आभार मानले आहेत. याबरोबच व्यायाम करण्याचा सल्लाही सुश्मिताने दिला आहे. ती म्हणाली, “मी व्यायाम करत असूनही, फिटनेसकडे इतकं लक्ष देत असूनही मला हृदयविकाराचा झटका आला. हा विचार करुन तुमच्यापैकी काही जण व्यायाम करणं बंद करतील. पण व्यायाम केल्यामुळेच मी यातून बरी होऊ शकले. त्यामुळे नियमित व्यायाम करा”.
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर सुश्मिताला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. शिवाय तिची अँजिओप्लास्टीही करण्यात आली आहे. लवकर बरी होऊन शूटिंगला सुरुवात करण्याच इच्छा सुश्मिताने व्यक्त केली आहे.