बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने गुपचूप लग्न उरकलं आहे. स्वराने समाजवादी पार्टीचा युवानेता फहाद अहमदशी लग्नगाठ बांधली आहे. ट्वीटरवरुन लग्नाचा व्हिडीओ शेअर करत स्वराने चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. ६ जानेवारीला स्वरा व फहादने कोर्ट मॅरेज केलं आहे.

स्वराने फहाद अहमदबरोबरचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वराने पहिल्या भेटीपासून ते लग्न करण्यापर्यंतच्या प्रवासाचा उलगडा केला आहे. स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर २०१९ मध्ये एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. प्रेमाच्या शोधात असलेल्या स्वरा व फहादला एकमेकांमध्ये चांगले मित्र भेटले. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. विशेष म्हणजे स्वराने फहादला त्याच्या लग्नात येण्याचं वचनही दिलं होतं. २०२० मध्ये फहादने त्याच्या बहिणीच्या लग्नाचं निमंत्रण स्वराला दिलं होतं. परंतु, स्वरा शूटिंगमध्ये व्यग्र असल्याने तिला फहादच्या बहिणीच्या लग्नात उपस्थित राहता आलं नाही. तेव्हा स्वराने फहादला त्याच्या लग्नात नक्की हजर राहण्याचं सांगितलं होतं. आणि त्यानंतर दोन वर्षांनी फहाद व स्वरा विवाहबंधनात अडकले.

हेही वाचा>> “मला माहित नव्हतं…” स्वरा भास्करचा पती फहाद अहमदचं ट्वीट चर्चेत

स्वराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्या दोघांना जवळ आणण्यात मांजरीचा मोठा वाटा असल्याचं म्हटलं आहे. स्वरा व फहाद दोघेही मांजरप्रेमी असल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून स्वराने त्यांची लव्हस्टोरी सांगितली आहे. आंदोलनादरम्यान काढलेला पहिला सेल्फी, लग्नातील फोटोंबरोबरच स्वरा व फहादच्या खास क्षणांचे फोटोही व्हिडीओत पाहायला मिळत आहेत. स्वराने फहादबरोबर लग्नगाठ बांधत तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. स्वरा व फहादला चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा>> समाजवादी पार्टीचा नेता ते CAA विरोधात आंदोलन; जाणून घ्या स्वरा भास्करचा पती फहाद अहमदबद्दल

बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असणाऱ्या स्वराने आजवर अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. स्वराचा पती फहाद एक सामाजिक कार्यकर्ता आहे. फहाद सीएएविरोधी आंदोलनात सहभागी झाला होता. समाजवादी पार्टीचा तो युवा नेता आहे.

Story img Loader