बॉलीवूडमध्ये असेही काही कलाकार आहेत की, जे त्यांच्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांसाठी ओळखले जातात. या कलाकारांमध्ये तापसी पन्नूचे नाव घेतले जाते. मात्र, त्याबरोबरच ही अभिनेत्री आपल्या परखड वक्तव्यांसाठीदेखील ओळखली जाते. आता ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला तापसीने दिलेल्या मुलाखतीत, तिच्या रोखठोक स्वभावामुळे तिला काही किंमत मोजावी लागते का याबाबत उत्तर दिले आहे.
तापसीच्या स्पष्टवक्तेपणाचा तिच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हे सांगताना तिने म्हटले आहे की, इथे काहीही फुकट मिळत नाही. लोक काय म्हणतील, माझ्याबद्दल काय विचार करतील याचे ओझे घेऊन मी जगत नाही. माझ्याकडे असे कुटुंब आहे, ज्यांना माझ्या या गोष्टी आवडतात. मला जसे आवडते, तसे जगण्यास मी प्राधान्य देते. माझ्या जगण्यातून, वागण्यातून मी याची खात्री करते की, मी स्वत:ला काय उत्तर देणार आहे, काय सांगणार आहे. जे चित्रपट मी निवडते किंवा एखाद्या मुद्द्यावर माझे मत मांडते, तेव्हा या गोष्टींची मी काळजी घेत असते. मी बोललेल्या किंवा केलेल्या गोष्टींची मला लाज वाटली नाही पाहिजे; नाही तर मी स्वत:ला तोंड दाखवू शकणार नाही. ही मोजावी लागणारी किंमत आहे.
“पापाचा तिरस्कार करा; पाप करणाऱ्याचा नाही”
इंडस्ट्रीमध्ये तू टोकाचा विचार करणारी आहेस, असे का म्हटले जाते? यावर बोलताना तिने म्हटले आहे, ”लोक असे म्हणतात. कारण- त्यांना मी अतिरेकी वाटत असेल; पण मला वाटत नाही. मी फार अतिरेकी गोष्टी करीत नाही, वागत नाही, बोलत नाही. मी स्वत:मध्ये कधीही कटुता येऊ दिली नाही. ‘पापाचा तिरस्कार करा; पाप करणाऱ्याचा नाही’ या उक्तीवर मी कायम चालत आलेली आहे. हे मी अभिमानाने सांगू शकते की, मी कधीही लोकांना टार्गेट केले नाही; पण जिथे समस्या असेल, ती बाब निदर्शनास आणून दिली आहे. जे चुकीचे आहे, त्याविरोधात उभी राहिली आहे. आजकाल लोक कोणतीही गोष्ट समजून न घेता, खूप लवकर एखाद्याची बाजू घेतात.” तापसीने हेदेखील कबूल केले की, तिला अनेक ठिकाणी डावलले गेले आहे. ती म्हणते, “आता मला या सगळ्याची सवय झाली आहे. तरीही मी जे काही चांगले, वाईट, किळसवाणे बोलले, त्याबद्दल मला अभिमान आहे. कारण- मला माहीत आहे की, मी कोणालाही उद्देशून बोलले नाही, कोणाचा अपमान केला नाही. त्यामुळे मला झोप चांगली लागते. मी ज्या प्रकारची व्यक्ती आहे, त्यासाठी मी किंमत मोजायला तयार आहे.”
हेही वाचा : दीपिका पादुकोण-रणवीर सिंहची संपत्ती आहे ७४५ कोटी रुपये, दोघांपैकी जास्त श्रीमंत कोण? जाणून घ्या
तापसीच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘डंकी’ चित्रपटात दिसली होती. आता ती लवकरच ‘फिर आयी हसीन दिलरुबा’ चित्रपटात विक्रांत मेस्सी आणि सनी कौशल यांच्यासोबत दिसणार आहे. हा चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या हसीन दिलरुबा या चित्रपटाचा सीक्वेल आहे. त्याबरोबरच तापसी ‘खेल खेल में’ चित्रपटात अक्षय कुमारबरोबर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.