हिमाचल प्रदेश आणि भारतातील अनेक उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हिमाचलमधील संपूर्ण जनजीवन पावसामुळे विस्कळीत झाले आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार याविषयी आपले मत मांडत तेथील स्थानिक नागरिकांसाठी प्रार्थना करत आहेत. बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री यामी गौतमनेही या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देत त्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
हेही वाचा : “तिथे एक बेशुद्ध मुलगी दिसली अन्…”, प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
यामी गौतम मूळची हिमाचल प्रदेशची आहे. अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर अनेकदा हिमाचलच्या सौंदर्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. या छायाचित्रांमधून ती हिमाचलच्या शांत, निसर्गरम्य जीवनाची झलक दाखवते. मात्र, हिमाचलमधील सद्य स्थितीवर अभिनेत्रीने दु:ख व्यक्त केले आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स’शी संवाद साधताना यामी म्हणाली, “खरोखरच दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाली आहे, असंख्य लोकांना यामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. सध्याचे चित्र माझ्यासाठी खूपच वेदनादायक आहे. अशी परिस्थिती भविष्यात कुठेच निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे.”
हेही वाचा : “तू कधीच चांगली आई होणार नाहीस”, आलिया भट्टने सांगितला ‘तो’ प्रसंग; म्हणाली, “कुटुंबासाठी मी माझे काम…”
यामी गौतम पुढे म्हणाली, “हिमाचलमधील सध्याचे व्हिडीओ पाहून मला अतिशय वाईट वाटले. निसर्गाने लोकांना हा रेड अलर्ट दिला आहे त्यामुळे, भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी तेथील लोकांनी आतापासूनच तयारी करणे आवश्यक आहे. आजच्या स्थितीला आपण सर्वजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे जबाबदार आहोत.”
हिमाचल प्रदेशमधील परिस्थितीवर परखड मत मांडत अभिनेत्री म्हणाली, “सध्या माझे कुटुंबीय आणि मित्रमंडळी सुरक्षित आहेत. ते सर्वजण नदी परिसरापासून दूर राहतात. पर्यटकांची संख्या गेल्या काही वर्षात वाढल्याने त्यांना आकर्षित करण्यासाठी अनेकांनी नदीजवळ इमारती, घरे बांधली हे सगळे प्रकार आज उद्धवलेल्या स्थितीला कारणीभूत ठरत आहेत. निसर्गाने आपल्याला काहीतरी सुंदर दिले आहे आणि आपण त्याची शुद्धता राखली पाहिजे.” दरम्यान, यामी लवकरच अक्षय कुमारबरोबर OMG 2 चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहे.