बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांची नातं आराध्या बच्चन लोकप्रिय स्टार किड्सपैकी एक आहे. सध्या तिचे सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. ज्यामध्ये तिचं अभिनय कौशल्य पाहायला मिळत आहे. नातीच्या या परफॉर्मन्स संदर्भात अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचं कौतुक केलं आहे.
काल (१५ डिसेंबरला) धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम पार पडला. या शाळेत शाहरुख खान, करीना कपूर, करण जोहर, शाहिद कपूर अशा अनेक सेलिब्रिटींची मुलं शिकायला आहेत. अमिताभ बच्चन यांची लाडकी नातं आराध्या देखील या शाळेची विद्यार्थीनी आहे. त्यामुळे तिने देखील वार्षिक स्नेहसंमेलनात सहभाग घेतला होता. यावेळी तिने एका नाटकात भूमिका साकारली होती. काळ्या रंगाच्या स्टायलिशन ड्रेस आणि पहिल्यांदाच वेगळ्या हेअरस्टाइलमध्ये आराध्या पाहायला मिळाली. तिचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.
हेही वाचा – “रणबीरला पहिल्यांदा भेटलो तेव्हा…” उपेंद्र लिमयेंनी सांगितला किस्सा; म्हणाले, “अहंकार…”
नातीचं काम पाहण्यासाठी आणि तिला प्रोत्साहन देण्यासाठी अभिषेक व ऐश्वर्याबरोबर बिग बींना या वार्षिक स्नेहसंमेलनाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या शेवटी अमिताभ बच्चन सर्व मुलांमध्ये मिसळून नाचताना देखील पाहायला मिळाले. अशातच अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर आराध्याच्या कामाचं कौतुक केलं.
अमिताभ यांनी ब्लॉगमध्ये लिहिलं, “लवकरच मी तुमच्या साथीला येईन. आराध्याच्या शाळेतील कार्यक्रमात मी व्यस्त होतो. तिचा परफॉर्मेन्स खूप छान झाला. आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण होता. छोटीचा रंगमंचावरील वावर अगदी सहज होता. असो पण ती इतकी छोटी नाहीये.”
दरम्यान, अमिताभ बच्चन लवकरच एकापेक्षा एक चित्रपट घेऊन येणार आहेत. अभिनेता प्रभास आणि दीपिका पदुकोणच्या ‘कल्कि 2898 AD’ या चित्रपटात बिग बी झळकणार आहेत. याशिवाय ‘तेरा यार हूं मैं’, ‘सेक्शन 84’ या चित्रपटांमध्ये अमिताभ पाहायला मिळणार आहेत.