एक असा बॉलीवूड चित्रपट ज्याची रिलीज डेट अनेकवेळा बदलली आणि अखेर तो पाच वर्षांनी प्रदर्शित झाला. ५ वर्षांत चित्रपटाचं बजेटही प्रचंड वाढलं. निर्मात्यांना चित्रपटाकडून प्रचंड अपेक्षा होत्या, पण त्याने निराशा केली. या चित्रपटाच्या निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागला होता.

मोठे कलाकार असूनही बरेचदा चित्रपट फ्लॉप होतात. असाच एक चित्रपट वर्षभरापूर्वी रिलीज झाला होता. या चित्रपटाने बजेटच्या निम्मीही कमाई केली नव्हती. स्पोर्ट्स ड्रामा असलेल्या या चित्रपटाचं नाव ‘मैदान’. हा चित्रपट फुटबॉल कोच सय्यद अब्दुल रहिम यांच्यावर आधारित होता. १९५१, १९६२च्या आशियाई खेळात भारताने सुवर्ण पदक जिंकण्यात सय्यद अब्दुल रहिम यांचं मोठं योगदान होतं.

‘मैदान’मधील कलाकार

‘मैदान’मध्ये अजय देवगण, प्रियामणी, गजराज राव, नितांशी गोयल, चैतन्य शर्मा, अभिलाष थापलियाल, विजय मौर्य आणि रुद्रनील घोष यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. इतके कलाकार असूनही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला होता. हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.

तब्बल ५ वर्षांनी झालेला रिलीज

या चित्रपटाच्या निर्मितीसाठी तब्बल पाच वर्षे लागली. याचं शूटिंग ऑगस्ट २०१९ मध्ये सुरू झालं. करोना व इतर काही कारणांमुळे चित्रपटाच्या निर्मितीला उशीर झाला. ‘मैदान’ रिलीज डेट ११ डिसेंबर २०२० ठरली होती, नंतर ती बदलून १३ ऑगस्ट २०२१ करण्यात आली. शूटिंग आणि नंतर पोस्ट-प्रॉडक्शनला उशीर झाल्यामुळे, त्याची नवीन रिलीज तारीख ३ जून २०२२ ठरवण्यात आली. पण व्हीएफएक्सचे काम पूर्ण न झाल्यामुळे चित्रपट पुन्हा एकदा पुढे ढकलावा लागला. अखेरीस, तो मागील वर्षी ईदच्या दिवशी ११ एप्रिल २०२४ ला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता.

‘मैदान’ सिनेमाचे बजेट अन् कलेक्शन

‘मैदान’च्या निर्मितीला उशीर झाला, परिणामी त्याचे बजेटही वाढले. डीएनएच्या वृत्तानुसार, हा सिनेमा २५० कोटी रुपये खर्चून बनवण्यात आला होता, पण बॉक्स ऑफिसवर बजेटच्या निम्मीही कमाई करू शकला नाही. अजय देवगणच्या या चित्रपटाला समीक्षकांकडून सकारात्मक आणि संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र हा चित्रपट प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला. सॅकनिल्कच्या वृत्तानुसार, ‘मैदान’ जगभरात फक्त ७१ कोटी रुपये कमवू शकला.

अक्षय कुमारच्या सिनेमाबरोबर झालेली टक्कर

अजय देवगणच्या ‘मैदान’ची बॉक्स ऑफिसवर अक्षय कुमारच्या ॲक्शन थ्रिलर ‘बडे मियाँ छोटे मियाँ’शी टक्कर झाली होती. ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, अलाया एफ, मानुषी छिल्लर हे कलाकार होते. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर आदळला होता. ३५० कोटी बजेट असलेल्या चित्रपटाने फक्त ६६ कोटी कमावले होते.