ज्या दिवशी भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला हरवून टी-२० विश्वचषक जिंकत यशाला गवसणी घातली तो दिवस भारतीय क्रिकेट संघासह चाहत्यांसाठीही खूप मोठा होता. या ऐतिहासिक विजयानंतर भारतात एखाद्या सणाप्रमाणे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. आता ४ जूनला हा विजेता संघ जेव्हा मुंबईत परतला तेव्हा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती. ‘बीसीसीआय’ने हा दिवस साजरा करण्यासाठी वानखेडे स्टेडियममध्ये भव्य सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. विजयाचा हा आनंद साजरा करण्यासाठी संघाची मरीन ड्राइव्ह ते वानखेडे मैदानापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. यादरम्यान, जमलेल्या गर्दीला खुल्या बसमधून हात उंचावत खेळाडू प्रतिसाद देताना दिसले. या उत्साहाने भरलेल्या गर्दीचे आणि आपला आनंद व्यक्त करताना निळ्या जर्सीमधील खेळाडू यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
आता यावर बॉलीवूडचे अनेक दिग्गज कलाकार व्यक्त होताना दिसत आहेत. विकी कौशल, आयुष्मान खुराना, अंगद बेदी, अनन्या पांडे, संजना संघी आणि बॉलीवूडचा किंग शाहरुख खान अशा अनेक कलाकारांनी आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. भारतीय क्रिकेट संघाने शेअर केलेला व्हिडीओ बॉलीवूडच्या कलाकारांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीजद्व्रारे शेअर केले. विकी कौशलने “वेलकम होम चॅम्पियन्स”; तर आयुष्मान खुरानाने “वेलकम होम बॉइज”, असे लिहिले आहे. संजना सांघीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या चाहत्यांच्या गर्दीचा व्हिडीओ शेअर करीत लिहिले आहे, “आम्ही आमच्या क्रिकेटला खूप गांभीर्याने घेतो.”
शाहरुख खानने आपल्या एक्स अकाउंटवर लिहिले आहे की, आपल्या मुलांना इतके आनंदी पाहून हृदय अभिमानाने भरून आले आहे. एक भारतीय म्हणून आपले खेळाडू इतक्या उंचीवर जात असताना पाहणे हा एक अद्भुत क्षण आहे. टीम इंडिया माझे तुमच्यावर सगळ्यांवर खूप प्रेम आहे, असे म्हणत किंग खानने आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या आहेत. अंगद बेदीने भारतीय क्रिकेट संघाचे वानखेडे स्टेडियमवरील फोटो शेअर करीत ‘वाहे गुरू’ असे लिहिले आहे. अनन्या पांडेनेदेखील भारतीय क्रिकेट संघाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर रिपोस्ट केला आहे.
भारतीय क्रिकेट संघाने २९ जून २०२४ रोजी टी-२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला हरवून ऐतिहासिक विजय नोंदविला आणि विश्वचषकावर भारताचे नाव कोरले.