Ratan Tata Passed Away: भारताचे प्रसिद्ध उद्योगपती, टाटा सन्सचे चेअरमन रतन टाटा यांचं निधन झालं आहे. ९ ऑक्टोबरला मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. ७ ऑक्टोबरला नियमित तपासणीसाठी रतन टाटा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८६व्या वर्षी रतत टाटा यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मंडळी शोक व्यक्त करत आहेत. बॉलीवूड कलाकारांनीदेखील सोशल मीडियाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

सलमान खानसहित ‘या’ बॉलीवूड कलाकरांनी श्रद्धांजली वाहिली

रतन टाटा यांच्या निधनानंतर सलमान खानने सोशल मीडियावर पोस्ट लिहिली. त्याने लिहिलं की, रतन टाटा यांच्या निधनाने खूप दुःख झालं आहे. तसंच संजय दत्तनेदेखील यासंदर्भात पोस्ट शेअर केली आहे. रतन टाटा यांचा फोटो शेअर करत संजय दत्तने लिहिलं आहे, “आज भारताने खरा दूरदर्शी गमावला आहे. ते सचोटीचे आणि करुणेचे दीपस्तंभ होते, ज्यांचे योगदान व्यवसायाच्या पलीकडे होते; ज्याचा असंख्य जीवनांवर परिणाम झाला. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो.”

हेही वाचा – रतन टाटा यांच्या निधनानंतर सिमी गरेवाल यांची भावनिक पोस्ट; म्हणाल्या, “तुमचं जाणं सहन करणं…”

संजय दत्त पोस्ट

याशिवाय अभिनेत्री प्रियांका चोप्राने शोक व्यक्त केला आहे. रतन टाटांचा फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिलं, “तुमच्या दयाळू स्वभावामुळे तुम्ही लाखो लोकांच्या आयुष्याला स्पर्श केला. तुमचं नेतृत्व आणि आदराचार्याचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत राहील. तुम्ही आपल्या देशासाठी जे काही केलं आहे, त्याबद्दल तुमचे आभार. तुम्ही आमच्यासाठी प्रेरणास्थान आहात आणि सर, तुमची खूप आठवण येईल.”

हेही वाचा – “एखाद्याला निरोप देताना सहज ‘टा-टा’ म्हणतो…”, रतन टाटांच्या निधनानंतर मनोरंजन विश्वात हळहळ, मराठी कलाकारांच्या भावुक पोस्ट

प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी, वाणी कपूर, राणा दग्गुबती, आयुष्मान खुराना, पुलकित सम्राट, शर्वरी जोशी, भूमी पेडणेकर, अथिया शेट्टी, अनुष्का शर्मा, तारा सुतारिया, वरुण धवन, बोमन इराणी यांनीदेखील सोशल मीडियावर हळहळ व्यक्त केली आहे. अजय देवगण लिहिलं की, रतन टाटा यांच्या जाण्याने जग शोक करत आहे. रतन टाटा यांचा वारसा पुढील पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहील. भारत आणि त्यापलीकडे त्यांचे योगदान अतुलनीय आहे. आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत.

अनुष्का शर्मा पोस्ट

हेही वाचा – एकेकाळी रतन टाटा होते ‘या’ बॉलीवूड अभिनेत्रीच्या प्रेमात, पण होऊ शकलं नाही लग्न

दरम्यान, रतन टाटा यांनी ७ ऑक्टोबरला आरोग्यासंबंधित येणाऱ्या अफावांविषयी पोस्ट शेअर केली होती. त्यामध्ये लिहिलं होतं की, माझ्या आरोग्याबाबत सुरू असलेल्या अफवा मला माहित आहेत. पण मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, या अफवा खोट्या आहेत. अशा आशयाची पोस्ट रतन टाटा यांनी सोशल मीडियावर शेवटची केली होती. त्यानंतर ९ ऑक्टोबरला त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला.