बॉलिवूड दिग्दर्शक अपूर्व लाखिया हा सध्या बराच चर्चेत आहे. यूट्यूबर सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे. अभिषेक बच्चनशी झालेला वाद ते विवेक ओबेरॉयला चित्रपटात घेतल्याने निर्मात्यांनी सोडलेली साथ यावर अपूर्वने सविस्तर चर्चा केली आहे. याच मुलाखतीमध्ये त्याने दाक्षिणात्य सुपरस्टार राम चरणबरोबर त्याचे संबंध चांगले नसल्याचा खुलासा केला आहे.
२०१३ साली अपूर्वने राम चरणला घेऊन अमिताभ बच्चन यांच्या सुप्रसिद्ध ‘जंजीर’ या चित्रपटाचा रिमेक केला होता. यामुळेच त्यांच्यातील संबंध फार चांगले नाहीत असं निदर्शनास आलं. राम चरण त्याचे फोन उचलत नसल्याची तक्रार अपूर्वने या मुलाखतीमध्ये केली. अपूर्व जेव्हा जेव्हा हैदराबादमध्ये असतो तेव्हा राम चरणची पत्नी त्याला नेहमी जेवणासाठी आमंत्रण देते असंही त्याने सांगितलं.
आणखी वाचा : अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी खुशखबर; ओटीटीवर नव्हे तर मोठ्या पडद्यावर येणार ‘ओह माय गॉड २’
याविषयी बोलताना अपूर्व म्हणाला, “राम चरणची पत्नी माझ्या मेसेजला उत्तर देते पण राम चरण मात्र माझे सध्या फोन उचलत नाही, कदाचित तो त्याच्या कामात असेल.” ‘आरआरआर’मुळे मिळालेल्या लोकप्रियतेमुळे आणि ‘जंजीर’ फ्लॉप झाल्यामुळे राम चरणने संपर्क बंद केला आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना अपूर्व म्हणाला, “तसं मला नाही वाटत, कारण तो माझा खूप चांगला मित्र आहे, आम्ही मध्यंतरी बऱ्याचदा भेटलो होतो, पण सध्या तो माझे फोनकॉल उचलत नाहीये.”
आणखी वाचा : विवेक ओबेरॉयमुळे अपूर्व लाखियाला पत्करावा लागला चित्रपटसृष्टीचा रोष; खुद्द दिग्दर्शकानेच केला खुलासा
याच मुलाखतीमध्ये जंजीरच्या अपयशाबद्दल बोलताना अपूर्व म्हणाला, “राम चरण, प्रियांका चोप्रा आणि संजय दत्त या ३ मोठ्या स्टार्सना घेऊन मी चित्रपट केला. तरीही तो बॉक्स ऑफिसवर आपटला. कदाचित लोकांना हीरो आवडला नव्हता, दाक्षिणात्य अभिनेत्याला तेव्हा हिंदीत आणायची वेळ चुकली असं मला कुठेतरी वाटतं. आज जर राम चरणने हिंदी चित्रपट केला तर तो ब्लॉकबस्टर ठरेल.”