सध्या भारतीय चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपट आणि चारित्रपट यांचं पेव फुटलं आहे. ऐतिहासिक चित्रपट तर दर महिन्याला प्रदर्शित होत आहेत. कंगनासारखी अभिनेत्री तर चक्क इंदिरा गांधी यांचा बायोपिक करत आहेत. अशात बॉलिवूडच्या महानायकावर चरित्रपट बनवायची संधी कोण सोडणार. अमिताभ बच्चन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक संदर्भात दिग्दर्शक आर. बाल्की यांनी मोठा खुलासा केला आहे.
‘बॉलिवूड हंगामा’च्या वृत्तानुसार बाल्की बच्चन यांच्यावर बायोपिक करण्यास फार उत्सुक आहेत. याबद्दल बोलताना बाल्की म्हणाले, “मला हा चारित्रपट बनवायची प्रचंड इच्छा आहे, पण यात मुख्य भूमिका कोण करणार? देशात असे लाखो अभिनेते आहेत ज्यांना बच्चन यांची भूमिका साकारायची इच्छा आहे, पण ते आव्हान पेलणार कोण? मला बच्चन यांच्या जीवनावर बायोपिक बनवायला नक्की आवडेल, पण सध्या माझ्या नजरेत तरी त्यांच्या भूमिका साकारण्यास पात्र कुणीच नाही.”
आणखी वाचा : “हृतिक तुझा पुढचा चित्रपटही…” चित्रपट समीक्षकाची भविष्यवाणी
यावर पुढे बोलताना बाल्की यांनी स्पष्ट केलं, “अभिषेक बच्चनही ही भूमिका पेलायचं आव्हान स्वीकारेल असं मला वाटत नाही, किंबहुना तो कधीच तशी भूमिका करणार नाही. कारण त्यालाही ठाऊक आहे बच्चन साकारणं अजिबात सोप्पं नाही.”
अमिताभ हे त्यांच्यासाठी लकी आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. शिवाय “मी बच्चनशिवाय कोणत्याही चित्रपटाचा विचारच करू शकत नाही.”असंही बाल्की यांनी स्पष्ट केलं आहे. ‘चूप’च्या माध्यमातून बाल्की यांनी एक वेगळा चित्रपट प्रेक्षकांना दिला आणि प्रेक्षकांनी तो उचलूनही धरला. सध्या ते अभिषेक बच्चनबरोबर त्यांच्या आगामी ‘घुमर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. या चित्रपटातही अमिताभ बच्चन दिसणार असल्याचं बाल्की यांनी स्पष्ट केलं आहे.