सातत्याने बॉलिवूडवर टीका करणारा अभिनेता आणि समीक्षक कमाल आर खान म्हणजेच केआरके हा सतत चर्चेत असतो. मध्यंतरी त्याने आमिर खानच्या चित्रपटाबद्दल विखारी शब्दांत टीका केली होती. ३० ऑगस्ट रोजी त्याला वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. स्वर्गीय अभिनेते ऋषि कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल काही वादग्रस्त ट्विट केआरकेने केलं होतं. ट्विटप्रकरणी खान याला पोलिसांनी गेल्या आठवड्यात मुंबई विमानतळावरून अटक केली होती. मात्र नंतर त्याला कनिष्ठ न्यायालयाने जामीन देऊन त्याची सुटका केली आहे.

सुटका झाल्यावर केआरकेने यापुढे कोणत्याही चित्रपटाचं समीक्षण तो करणार नाही असं जाहीर केलं होतं, पण तरी तो बॉलिवूडच्या चित्रपटांवर आणि कलाकारांवर टीका करताना दिसत आहे. आता त्याच्या निशाण्यावर बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आला आहे. सैफच्या एका वक्तव्यावरुन कमाल खानने सैफला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

आणखी वाचा : महिलांच्या आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या नराधमाची गोष्ट उलगडणार, पोस्टर प्रदर्शित

सैफ आणि हृतिकचा ‘विक्रम वेधा’ बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. या चित्रपटाकडून बॉलिवूडला अपेक्षा होत्या. याचबाबत सैफ अली खानने चित्रपटाचं समीक्षण करणाऱ्या लोकांवर टीका केली होती. सैफच्या याच वक्तव्यावर कमाल खानने ट्वीट करत सैफची चांगलीच कानउघडणी केली आहे. केआरकेने ट्वीटमध्ये लिहिलं की, “सैफ अली खान एका मुलाखतीत म्हणाला की त्याने काही रिव्यू वाचले आणि तो म्हणाला की बाहेरून आलेली ही मंडळी आम्हाला चांगला चित्रपट बनवायचा कसा ही शिकवणार का? हा नवाबला वाटतं बॉलिवूड ही त्याची जहागीर आहे, याचा अर्थ हा बॉलिवूडचा नवाब बाहेरून येणाऱ्या कलाकारांना कस्पटासमान किंमत देतो.”

केआरकेचं ही ट्वीट चांगलंच व्हायरल झालं आहे. ट्विटरवर केआरकेने पोलच्या माध्यमातून लोकांची प्रतिक्रिया घेतली. त्या पोलचे निकाल पाहता लोकांनी केआरकेने पुन्हा चित्रपटांचं समीक्षण सुरू करायला हवं अशी मागणी केली आहे. केआरकेने ‘विक्रम वेधा’ बघून झाल्यानंतर त्या चित्रपटाची तुलना भोजपुरी चित्रपटाशी केली होती.

Story img Loader