सध्या बॉलिवूडमध्ये कोणाचं नाणं खणखणीत वाजत असेल तर ते अभिनेता कार्तिक आर्यनचं. मागच्या वर्षी बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांचे चित्रपट आपटले मात्र कार्तिक आर्यनने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली. एकीकडे शाहरुखच्या ‘पठाण’ची घोडदौड सुरूच आहे. या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता याच चित्रपटाला टक्कर द्यायला कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट कसा आहे ते जाणून घेऊयात…
कथानक :
८०,९० च्या दशकातील कथानकाला शोभवे असे कथानक या चित्रपटाचे आहे. परेश रावल व रोनित रॉय यांनी साकारलेली पात्र जिंदाल ग्रुपमध्ये क्लार्क म्हणून लागतात, मात्र रोनीत रॉय थेट जिंदाल ग्रुप मालकाच्या (सचिन खेडेकर) मुलीशी (मनीषा कोईराला) शी लग्न करतो. त्यामुळे तो थेट कंपनीचा मालक बनतो. हीच गोष्ट परेश रावल यांना खटकते. त्याचदरम्यान दोघांच्या पत्नी डिलिव्हरीसाठी एकाच हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. परेश रावल हे मुद्दाम मुलांची अदलाबदल करतात कारण त्यांना स्वत:चा मुलगा श्रीमंत घरात वाढवा अशी अपेक्षा असते, म्हणून ते अदलाबदल करतात. इथवर चित्रपटाचे कथानक ‘जुडवा’ ‘अमर अकबर अँथनी’ चित्रपटाच्या कथानकांसारखे वाटते.
श्रीमंत घरात जन्म घेतलेला कार्तिक आर्यन, परेश रावल यांच्या घरात वाढतो तर त्यांच्या पोटी जन्म घेतलेला अंकुर राठी (नवोदित अभिनेता) हा श्रीमंत घरात वाढतो. शिक्षणासाठी तो परदेशात जातो तर कार्तिक आर्यन इथेच कायद्याचे शिक्षण घेतो. या दरम्यान होते चित्रपटातल्या हिरॉइनची एंट्री, क्रिती सॅनॉन एक फर्म चालवत असते. कार्तिक आर्यन तिच्याकडे नोकरीसाठी जातो आणि पाहताच क्षणी (पेह्ली नजर का प्यार) तिच्या प्रेमात पडतो. या आधी दोघे ‘लुका छुपी’ चित्रपटात झळकले होते. तिला इम्प्रेस करण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या करत असतो. दुसरीकडे अंकुर राठी हा परदेशातून शिक्षण घेऊन येतो मात्र त्याच्याकडे व्यवहार ज्ञान नसल्याने तो व्यवसायात हातभार लावू शकत नसतो. सगळं काही सुरळीत असताना व्हिलनची एंट्री होते. सनी हिंदुजा या अभिनेत्याने नकारत्मक भूमिका साकारली आहे. रोनित रॉयचा तो व्यावसायिक क्षत्रू असतो. खरं तर या दोघांची मैत्री असते मात्र रोनित रॉयला त्याच्या व्यवसायातल्या काही गोष्टी खटकतात आणि त्यांच्यात दरी निर्माण होते. रोनित रॉयने व्यवसाय करण्यास नकार दिल्याने तो त्याच्यावर हल्ला करतो. त्यादरम्यान कार्तिक आर्यन रोनित रॉयला वाचवतो.
Farzi Web series Review : खोट्या चलनी नोटांच्या बाजारातील कटू सत्य मांडणारी चित्तथरारक सीरिज
रोनित रॉयला हॉस्पिटलमध्ये दाखल करताना कार्तिक आर्यनला समजते की परेश रावल आपले वडील नसून रोनित रॉय आपले खरे वडील आहेत. इथे चित्रपटात खरा ट्विस्ट, कार्तिकच्या या कृतीने जिंदाल ग्रुपचे मालक (सचिन खेडेकर) व रोनित रॉय खुश होतात आणि त्याला स्वतःच्या कंपनीत कामाला ठेवतात. नेहमीप्रमाणे चित्रपटाचा नायक कार्तिक आर्यन सगळ्यांची मनं जिंकतो. कार्तिक आर्यनच आपला वारसदार आहे हे जिंदाल कुटूंबाला कळते का यासाठी तुम्हाला चित्रपट पाहावा लागेल.
अभिनय :
कार्तिक आर्यन चित्रपटात आपल्या नेहमीच्याच अंदाजात दिसला आहे. त्याच्याप्रमाणे या चित्रपटात ॲक्शनदेखील करताना दिसत आहे. क्रिती सॅनॉनने तिच्या वाट्याला आलेली भूमिका उत्तम वठवली आहे, चित्रपटात तिचा ग्लॅमर्स अंदाज पाहायला मिळतो. सचिन खेडेकर, रोनित रॉय, परेश रावल, मनीषा कोईराला यांचे अभिनय चोख आहेत. राजपाल यादव अभिनेत्याला केवळ एक सीन देण्यात आला आहे. मात्र तो ही तितका जमून आलेला नाही. धवन कॅम्पमध्ये त्याच्या वाट्याला कायमच मोठ्या भूमिका आल्या आहेत.
दिग्दर्शन :
डेव्हिड धवन यांनी आपल्या कारकिर्दीत गोविंदाला घेऊन अनेक दाक्षिणात्य चित्रपटांचे रिमेक हिंदीत केले आहेत आणि यशस्वी झाले आहेत. त्यांच्या मुलाला मात्र ही नस पकडता आलेली नाही. मध्यंतरानंतर चित्रपट रेंगाळतो. चित्रपटाची लांबी वाढवण्यासाठी गाणी टाकली आहेत. मात्र ‘मुंडा सोणा’हे एकमेव गाणं लक्षात राहतं. संवाद लेखन अजून जमून आले असते. चित्रपटातील भावुक सीन्स अजून खुलवता येऊ शकले असते.
हा मूळ चित्रपट अल्लू अर्जुनच्या ‘अला वैकुंठपुरमुलू’ तेलगू या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाचे कथानक हे दाक्षिणात्य चित्रपटाला साजेसे आहे मात्र बॉलिवूडमध्ये आता प्रेक्षकांची चव बदलली आहे. त्याच त्याच जुन्या मसालापटांना प्रेक्षक कंटाळले आहेत, काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘विक्रम वेधा’ हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर पडला मात्र सध्या कार्तिक आर्यनची चर्चा आहे. त्यामुळे त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षक डोक्यावर घेतील हा हे काही दिवसात कळेलच.