Satish Kaushik Death : चित्रपट असो किंवा नाटक यातील पात्र कायमच प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. मग ते अजरामर ‘शोले’ चित्रपटातील ‘गब्बर सिंग’ असो किंवा ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील अमरीश पुरींनी साकारलेलं ‘मोगॅम्बो’ हे पात्र असो इतकी वर्ष होऊनदेखील प्रेक्षकांच्या आजही ती पात्र आणि पात्र साकारलेले अभिनेते लक्षात आहेत. असेच एक विनोदी पात्र जे आजही प्रेक्षक बघून खळखळून हसतात ते म्हणजे ‘पपू पेजर’, ‘दिवाना मस्ताना’ चित्रपटातील सतीश कौशिक यांनी ते पात्र रंगवले होते. या अतरंगी पात्राचा नेमका जन्म कसा झाला याबद्दल सतीश कौशिक यांनी सांगितले होते.
हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माता आणि दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे निधन झालं आहे. वयाच्या ६६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते नुकतेच काही दिवसांपूर्वी कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते. तिथे त्यांनी आपल्या कारकिर्दीबद्दल, चित्रपटसृष्टीबद्दल भाष्य केले आहे. पप्पू पेजर या पात्राबद्दल बोलताना ते असे म्हणाले, “जेव्हा मला डेव्हिड धवन यांनी हे पात्र सांगितले तेव्हा मी त्यांना म्हणालो यात काही मजा नाही. तेव्हा मी आणि चित्रपटाच्या लेखकाने ( रुमी जाफरी) त्यावर काम केले. तेव्हा मी रुमीला सांगितला की रमेश सिप्पी यांच्या ‘सागर’ चित्रपटात मी छोटीशी भूमिका साकारली होती.”
‘मिस्टर इंडिया’मधील कॅलेंडर ते ‘डबल धमाल’चा बाटा भाई; सतीश कौशिक यांनी साकारलेल्या अजरामर भूमिका
ते पुढे म्हणाले,”त्या सेटवर एका फोटोग्राफर होता तो पान खायचा आणि विशिष्ठ पद्धतीत लोकांना हाकी मारायचा. ‘अबे झंटुले झटक इधर आ तेरी फोटो खिचवानी हैं’, झंटुले झटक असा कसा शब्द असतो पण हाच शब्द आम्ही पप्पू पेजरच्या संवादामध्ये सुरवातीला वापरला.” असा किस्सा त्यांनी सांगितला. त्यांनी साकारलेले पप्पू पेजर हे पात्र खरं तर एका गुंडांचे होते मात्र ते विनोदी अंगाने दाखवल्याने जास्त लक्षात राहिले. त्या चित्रपटात जॉनी लिव्हरसारखे विनोदाचे बादशहादेखील होते.
सतीश कौशिक यांनी पप्पू पेजरच्याबरोबरीने मिस्टर इंडियातील कॅलेंडर (मिस्टर इंडिया), चंदा मामा (मिस्टर अँड मिसेस खिलाडी), मुथ्थु स्वामी (साजन चले ससुराल), काशीराम (राम लखन), बाटा भाई (डबल धमाल) अशी अनेक पात्र रंगवली आहेत. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.