संगीत विश्वातील प्रसिद्ध संगीतकार, गायक प्रीतम चक्रवर्ती यांचं मोठं नुकसान झाल्याचं समोर आलं आहे. प्रीतम यांच्या स्टुडिओमधील काम करणारा एक व्यक्ती लाखो रुपयांची बॅग घेऊन फरार झाला आहे. याप्रकरणी संगीतकार प्रीतम चक्रवर्तीने एफआयआर दाखल केला असून पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत.
प्रीतम चक्रवर्ती यांचा स्टुडिओ युनिमस रेकॉर्ड प्रायव्हेट लिमिटेड गोरेगाव-मालाड लिंक रोड येथील रुस्तमजी ओजोन बिल्डिंगमध्ये आहे. याच स्टुडिओमध्ये ४ फेब्रुवारीला दुपारी २ वाजता चोरी झाली. स्टुडिओमध्ये काम करणारा व्यक्ती दुपारी आला आणि त्याने निर्माता मधु मनटेनाचं नाव सांगून कामाच्या बहाण्याने ४० लाखांची बॅग घेऊन फरारा झाला.
चोरी करणाऱ्या व्यक्तीचं नाव आशिष सायाल असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेच्या वेळी प्रीतमच्या स्टुडिओमध्ये आशिष व्यतिरिक्त अहमद खान आणि कमल दिशादेखील होती. पण, आशिष संशयास्पद असून तो फरार झाला आहे. त्याचा फोन बंद येत आहे. तसंच जेव्हा प्रीतम यांचा मॅनेजर आशिषच्या घरी गेला होता, तेव्हा तिथे कोणीच नव्हतं. त्यामुळेच मॅनेजरने तात्काळ मालाड पोलीस स्थानकात धाव घेतली आणि एफआयआर दाखल केला. परंतु, अद्याप या प्रकरणावर स्वतः प्रीतम चक्रवर्ती यांनी कोणतंही भाष्य केलेलं नाही.
दरम्यान, प्रीतम चक्रवर्तीच्या कामाबद्दल बोलायचं झालं, गेल्या अडीच दशकापासून ते संगीत विश्वात अविरत काम करत आहेत. त्यांनी आजवरच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी तयार केली आहेत. यामध्ये ‘धूम’, ‘भागमभाग’, ‘गँगस्टर’, ‘लाइफ इन अ मेट्रो’, ‘ढोल’, ‘जब वी मेट’, ‘रेस’, ‘जन्नत’, ‘मौसम’, ‘ऐ दिल है मुश्किल’, ‘बजरंगी भाईजान’, ‘छिछोरे’ आणि ‘दंगल’ यांसारख्या अनेक चित्रपटातील गाणी प्रीतम यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्यांना फिल्मफेअर आणि राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आलं आहे.