‘पठाण’, ‘जवान’ या चित्रपटांनंतर पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यासाठी शाहरुख खानचा ‘डंकी’ चित्रपट सज्ज झाला आहे. शाहरुखचा बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘डंकी’ चित्रपट २१ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सध्या किंग खान चांगलाच चर्चेत आहे. अशातच शाहरुखचा मुंबई विमानतळावर एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमधील अभिनेत्याच्या एका कृतीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’च्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये शाहरुख काळ्या रंगांच्या कपड्यात दिसत आहे. यावेळी सुरक्षा रक्षक शाहरुख खानला पासपोर्ट आणि इतर कागदपत्र पडताळणीसाठी अडवतो. त्यानंतर शाहरुख विनम्रतेने पासपोर्टसह इतर कागदपत्र सुरक्षा रक्षकाला हसत-हसत दाखवतो. किंग खानच्या याच विनम्र स्वभावाने पुन्हा एकदा चाहत्यांची मनं जिंकली आहे. मुंबई विमानतळावरील शाहरुखचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
हेही वाचा – “पुरुषांना महिन्यातून सात दिवस…”, नीना गुप्ता यांच्या ‘फालतू फेमिनिझम’ विधानावर कंगना रणौतची प्रतिक्रिया
शाहरुखच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी लाइक्स आणि प्रतिक्रियेच्या माध्यमातून प्रेम व्यक्त केले आहे. ‘यशाची व्याख्या शाहरुख खान आहे’, ‘बॉलीवूडचा किंग’, ‘खरा डॉन’, ‘प्रोटोकॉलचा सन्मान करणारा आणि कधीच नियम न तोडणारा किंग खान आहे’, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या व्हिडीओवर उमटल्या आहेत.
हेही वाचा – ‘अवतार ३’कधी येणार? दिग्दर्शक जेम्स कॅमेरून यांचा मुलाखतीदरम्यान खुलासा
दरम्यान, शाहरुख खानच्या आगामी ‘डंकी’ चित्रपटातील ‘लुट पुट गया’ हे गाणं सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. या गाण्यावरील रील्स चांगलेच व्हायरल होतं आहेत. ‘डंकी’ या चित्रपटात शाहरुख खान व्यतिरिक्त तापसी पन्नू, विक्की कौशल पाहायला मिळणार आहे. ‘हा चित्रपट अवैध स्थलांतर या गंभीर मुद्द्यावर भाष्य करणारा आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.