प्रभास, सैफ अली खान आणि क्रिती सेनॉन यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘आदिपुरुष’ चित्रपट १६ जून २०२३ रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला. चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा ओलांडला असला, तरी यामधील काही संवाद आणि दृश्यांबाबत सोशल मीडियावर गोंधळ सुरु आहे. चित्रपटातील संवाद, व्हिएफएक्स तसेच प्रभास, सैफ अली खान व क्रिती सेनॉन यांच्या लुकवरून नेटकरी नाराजी व्यक्त करत आहेत. दिग्दर्शक ओम राऊत आणि लेखक मनोज मुंतशीर यांच्यावर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यावर आता रामानंद सागर यांच्या रामायणात भगवान रामाची भूमिका साकारलेल्या अरुण गोविल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अभिनेते अरुण गोविल यांनी ‘न्यूज18’ शी संवाद साधताना हिंदू देवी-देवतांची खिल्ली उडवणाऱ्या निर्मात्यांवर संताप व्यक्त केला. ते म्हणाले, “‘आदिपुरुष’च्या टीमने चित्रपटगृहांमध्ये भगवान हनुमानासाठी एक जागा रिकामी सोडण्याचा निर्णय घेतला होता. हा त्यांचा प्लॅन आणि चित्रपटाच्या प्रमोशनचा एक भाग होता. एकतर निर्मात्यांना स्वत:वर विश्वास नव्हता म्हणून त्यांनी असा प्रमोशनल स्टंट केला आणि दुसरी गोष्ट म्हणजे, त्यांना माहिती होते की, हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर गोष्टी बिघडणार आहेत.”
अरुण गोविल पुढे म्हणाले, “एक व्यापारी म्हणून तुम्ही अशा डावपेचांचा वापर करता, परंतु तुम्ही स्वत:ला कसे वाचवाल? कोणत्याही परिस्थितीत केवळ प्रमोशनचा भाग म्हणून अशा गोष्टी करणे चूक आहे. “
दरम्यान, अरुण गोविल यांच्याप्रमाणे ‘शक्तिमान’ फेम मुकेश खन्ना यांनीही ‘आदिपुरुष’च्या टीमवर आणि चित्रपटातील संवादांवर टीका केली होती. चित्रपटात प्रभासने प्रभू श्रीराम यांची, क्रिती सेनॉनने माता सीतेची, सैफ अली खानने रावणाची व देवदत्त नागे याने हनुमानाची भूमिका साकारली आहे.