आपल्या सुमधूर आवाजाने ९० च्या दशकात बॉलीवूडमधील अनेक लोकप्रिय गाण्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या गायिका अलका याज्ञिक यांना एका दुर्मिळ आजाराचं निदान झालं आहे. त्यांनी सोशल मीडियावर यासंदर्भात पोस्ट करून माहिती दिली. त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला आहे, असं त्यांनी सांगितलं.
अलका यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्हायरल अटॅकनंतर त्यांना हा त्रास झाला. एके दिवशी फ्लाइटमधून बाहेर पडताना त्यांना जाणवलं की आपल्याला काहीच ऐकू येत नाही. अलका यांनी या दुर्मिळ स्थितीबद्दल माहिती देताना चाहत्यांना आणि सहकलाकारांना मोठ्या आवाजातील म्युझिकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
इन्स्टाग्रामवर अलका याज्ञिक यांनी लिहिलं, “माझे सर्व चाहते, मित्र, फॉलोअर्स आणि हितचिंतकांनो. काही आठवड्यांपूर्वी मी फ्लाइटमधून बाहेर पडत होते आणि मला अचानक जाणवलं की मला काहीही ऐकू येत नाही. यानंतर माझे जे हितचिंतक व मित्र विचारत आहे की मी कुठे गायब आहे, त्यांच्यासाठी काही आठवड्यांत थोडी हिंमत एकवटल्यानंतर मी या विषयावर बोलायचं ठरवलं आहे. मला दुर्मिळ सेन्सरी नर्व्ह हिअरिंग लॉसचे निदान माझ्या डॉक्टरांनी केले आहे. हे एका व्हायरल अटॅकमुळे झालं आहे. अचानक घडलेल्या या गोष्टीमुळे मला मोठा धक्का बसला आहे. मी त्याला स्वीकारण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे कृपया तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा.”
अलका यांनी यावेळी त्यांच्या चाहत्यांना आणि इतर गायकांना महत्त्वाचा सल्ला दिला आहे. “मला हेडफोन्स आणि मोठ्या आवाजातील संगीताबद्दल माझ्या चाहत्यांना आणि तरुण सहकाऱ्यांना इशारा देऊ इच्छिते. एखाद्या दिवशी मी माझ्या प्रोफेशनमुळे आरोग्याला होणाऱ्या हानीबद्दल नक्कीच बोलेन. तुमच्या सर्व प्रेमाने आणि पाठिंब्यामुळे मी माझे आयुष्य पुन्हा रुळावर आणण्याची आशा करते आणि लवकरच तुम्हाला पुन्हा भेटेन अशी आशा बाळगते. या कठीण काळात तुमचा पाठिंबा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे,” असं त्या म्हणाल्या.
५८ वर्षीय अलका याज्ञिक या लोकप्रिय भारतीय गायिका आहेत. त्या नव्वदच्या दशकातील सर्वोत्कृष्ट गायकांपैकी एक आहेत. चार दशकांहून अधिक काळांपासून त्या तिच्या गाण्यांद्वारे लोकांचे मनोरंजन करत आहे. या काळात त्यांनी ‘तू शायर है मैं तेरी शायरी’, ‘गली में आज चांद निकला’, ‘अगर तुम साथ हो’ अशा अनेक सुपरहिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. अलका अनेक स्टेज शो करत असतात. त्यांनी आता त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिल्यावर चाहते काळजी व्यक्त करत आहेत.