बॉलीवूडचा लोकप्रिय गायक बेनी दयाल त्याच्या गाण्यांमुळे चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत असतो. संगीतप्रेमींना त्याची गाणी रोज ऐकायला आवडतात. इतकंच नाही तर बेनी अनेक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसाठी त्याच्या गाण्याचे कार्यक्रमही आयोजित करतो. आता अलीकडेच बेनी स्टेजवर लाइव्ह कॉन्सर्ट करत असताना त्याच्याबरोबर एक दुर्घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बेनी एका लाइव्ह कॉन्सर्टदरम्यान परफॉर्म करत असताना एका ड्रोन मुळे तो जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याने आपल्या इंस्टाग्राम हँडलवर एका व्हिडिओद्वारे या घटनेची माहिती दिली. बेनी म्हणतो, “माझ्या तब्येतीबद्दल इतकी विचार पुस केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. लाइव्ह स्टेज परफॉर्मन्स दरम्यान, ड्रोन चुकून माझ्या डोक्यावर आदळला, त्यामुळे माझ्या बोटांना आणि डोक्याला थोडी दुखापत झाली होती, पण आता सर्व काही ठीक आहे. मी खूप लवकर बरा होईन. तुमच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनांसाठी खूप धन्यवाद.”
आणखी वाचा : ‘ब्रह्मास्त्र २’ कधी येणार? दिग्दर्शक अयान मुखर्जीने सोडलं मौन, म्हणाला…
त्याच्या या व्हिडिओमध्ये बेनी पुढे म्हणतो, “मला प्रत्येक गायकासाठी तीन गोष्टी सांगायच्या आहेत. जेव्हा तो लाइव्ह कॉन्सर्ट करतो तेव्हा तो कार्यक्रम करत असताना ड्रोन त्याच्या जवळ येणार नाही याची काळजी घ्या कारण ड्रोनला अचानक येण्यापासून थांबवता येत नाही. तुम्हाला तुमच्याबरोबर अशी व्यक्ती हवी जी विशेषतः ड्रोनवर काम करत असेल. मी विनंती करू इच्छितो की सर्व महाविद्यालये, कंपन्या, शो किंवा कार्यक्रमांच्या आयोजकांनी शक्य होतील तितके कमी ड्रोन वापरावे कारण ते अतिशय धोकादायक आहे.”
बेनीच्या या पोस्टवर संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकारांनी कमेंट करून त्याच्या तब्येतीबद्दलची माहिती घेतली. अरमान मलिकने कॉमेंट करत लिहिलं की “यार हा गोंधळ आहे. लवकर बरा हो बेन!” शर्ली सेटियानेही कमेंट केली, “ओह माय गॉड!! आपण भेटल्यानंतरच ही घटना घडली असेल. काळजी घे बेनी, तू लवकर बरा होशील!” याबरोबरच चाहत्यांनीही बेनीला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.