bollywood singer rekha bhardwaj : बॉलीवूडच्या काही लोकप्रिय गायिकांपैकी एक म्हणजे रेखा भारद्वाज. रेखा यांनी आजवर आपल्या अनेक सुमधुर गाण्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं आहे. त्यांच्या आवाजाचे अनेक चाहते आहेत. गायिकेचे देशभरासह अनेक ठिकाणी गाण्याचे कार्यक्रम होत असतात. ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पहायला मिळतात. अशातच रेखा यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि या व्हिडीओमध्ये त्या संतप्त झाल्याचे दिसत आहेत.

फटाक्यांमुळे रेखा भारद्वाज यांनी मध्येच थांबवलं गाणं

गाण्यांच्या कार्यक्रमांदरम्यान काही परिस्थितीमुळे गायकांना अनेकदा त्यांचं गाणं मध्येच थांबावावं लागतं. असंच काहीसे रेखा यांच्याबरोबर घडलं आणि त्यामुळे त्या गाणं गाता-गाता मध्येच थांबल्या. भोपाळमध्ये एका संगीत कार्यक्रमात त्या गाणं सादर करत असताना अचानक फटाके फुटू लागले आणि त्या फटाक्यांच्या आवाजमुळे त्यांनी आपलं गाणं थांबवलं. त्या काही काळ डोळे मिटून शांत उभ्या होत्या. शेवटी त्यांनी फटाके न फोडण्याची विनंतीही केली.

“कृपया बंद करा” म्हणत फटाके थांबवण्याचं आवाहन

सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये त्या असं म्हणतात की, “हे फटाके खूपच असंगीतिक आहेत. अगदी चुकीच्या वेळी फोडण्यात आले आहेत.” याशिवाय “आजूबाजूचे लोक झोपले असतील. कृपया ते बंद करा” असं म्हणत त्यांनी ते फटाके थांबवण्याचे आवाहनही केले. रेखा या ‘लंबी जुदाई’ हे लोकप्रिय गाणं सादर करत असताना फटाके फुटले. तरीही रेखा संयमाने फटाके वाजणे कमी होण्याची वाट पाहत होत्या. पण तरीही ते बंद होत नसल्याने त्या काहीशा संतप्त झाल्या.

रेखा यांच्या संयमाचं चाहत्यांकडून कौतुक

थोड्या वेळाने फटाके फुटणे बंद झाले आणि रेखा यांनी पुन्हा एकदा आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांनी गाणं गायला सुरुवात करताच रसिकांनीही पुन्हा एकदा त्यांच्या सुरात सुर मिसळले. दरम्यान, या व्हिडीओवर अनेक नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. ‘हे असं करणं अयोग्य आहे’, ‘तिने खूप धीर दाखवला’, धीराने त्यांनी पुन्हा गाणं सुरू केलं याला कलाकार म्हणतात’ अशा अनेक कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडीओला प्रतिसाद दिला आहे.

रेखा भारद्वाज यांच्या गाण्यांबद्दल थोडक्यात

रेखा यांच्याबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी आजवर अनेक हिट गाणी गायली आहेत. ‘नमक इश्क का’, ‘कबीरा’, ‘लडकी’, ‘गेंदा फूल’, ‘ऐसे क्यूं’, ‘सो जा सो जा’, ‘सखी री’, आणि ‘ये इश्क है’ ही तिची काही लोकप्रिय गाणी आहेत. या व्यतिरिक्त, तिने ‘तेरी फरियाद’, ‘दम गुट्टा है’, ‘जिंदा’, ‘मिले मिले’, ‘हमारी अतारिया पे’, ‘घागरा’, ‘ओये बॉय चार्ली’ आणि ‘फिर ले आया दिल’ यांसारख्या संस्मरणीय गाण्यांनाही आपला आवाज दिला आहे. ज्यामुळे त्यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे.