बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगम हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. आपल्या आवाजाने त्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनू गायनाच्या बरोबरीने सोशल मीडियावर सक्रीय असतो. आपली मतं तो ठामपणे मांडत असतो. नुकतीच त्याने बॉयकॉट बॉलिवूड आणि शाहरुख खानच्या पठाणवर भाष्य केलं आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे गेले दोन दिवस मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चित्रपट निर्मात्यासह अभिनेत्यांची भेट घेतली. यात सोनू निगम सुनील शेट्टी हे उपस्थित होते. या भेटीनंतर आज तकला बॉलिवूडवरील बहिष्काराच्या ट्रेंडवर प्रतिक्रिया देताना सोनू निगम म्हणाला, “ज्यांना काही फरक पडत नाही त्यांच्याशी मी का बोलू? ज्यांना मला काय म्हणायचे आहे ते समजत नाही त्यांच्याशी मी का बोलू? कलाकार आणि लोकांनी सोशल मीडियावर आपले डोके खाली ठेवून पुढे जावे.”
शाहरुख खानचा आगामी चित्रपट ‘पठाण’ येत्या काही दिवसात प्रदर्शित होणार आहे. यातील ‘बेशरम रंग’ हे गाणे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ठिकठिकाणी या गाण्याला विरोध केला गेला आहे. सेन्सॉर बोर्डानेदेखील या गाण्यात आणि चित्रपटामध्ये बदल करण्यास सांगितले आहेत. याच प्रकारावर सोनू निगमने बोलणे टाळले. जेव्हा सोनू निगमला आजतकने यावर भाष्य करण्यास सांगितले तेव्हा त्याने त्याकडे दुर्लक्ष केले.
चित्रपटसृष्टी उत्तरप्रदेशला जाणार यावरून त्याने आपली प्रतिक्रिया दिली, “आम्ही उत्तर प्रदेशमध्ये गेल्या काही वर्षांत बरेच बदल पाहिले आहेत. माझे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशचे, त्यामुळे त्यांच्याकडून आम्हाला तिकडच्या बातम्या समजतात. तिथे खूप सुरक्षितता आणि शांतता आहे. तिथे फिल्म इंडस्ट्री सुरू करण्याच्या चर्चा सुरू आहेत, जे खूप चांगले आहे. मुंबई प्रत्येकाची आई आहे, इथे येऊन अनेक लोक शिकतात. इथेच संघर्ष करतात. मी इथे खूप मेहनत करायला शिकलो. इकडे आम्ही काम करण्याची पद्धत शिकलो. उत्तरप्रदेशात फिल्म सिटी सुरू झाली तर त्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही.” अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.