चित्रपट, मालिका, वेब सीरिजमध्ये दिसणारे अनेक कलाकार हे विविध उत्पादनांच्या जाहिरातींमध्ये काम करताना दिसतात. मग ती सौंदर्य प्रसाधने असो वा खाण्याचे पदार्थ असोत. यामध्ये बॉलीवूडचा किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरूख खानचादेखील समावेश आहे. आता मात्र एका जाहिरातीमुळे शाहरूख खान (Shah Rukh Khan)ला नोटीस बजावण्यात आली आहे.

शाहरूख खान, अजय देवगण टायगर श्रॉफ हे बॉलीवूड अभिनेत विमल पान मसालाची जाहिरात करताना दिसतात. ही जाहिरात चुकीची माहिती देत असल्याची तक्रार जयपूरमधील एका रहिवासी असलेल्या व्यक्तीने केली होती. त्यानंतर जयपूरमधील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राने शाहरूख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्यासह JB(जेबी) इंडस्ट्रीजचे अध्यक्ष यांना नोटीस बजावली आहे. पान मसाल्यात केशर असल्याचा दावा करणाऱ्या जाहिरातीबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राने त्यांना १९ मार्च रोजी प्रत्यक्ष किंवा प्रतिनिधीमार्फत हजर राहण्याचे समन्स बजावले आहे.

नेमके प्रकरण काय?

जयपूरचे रहिवासी योगेंद्र सिंह बडियाल यांनी विमल पान मसाल्याची जाहिरात दिशाभूल करणारी असल्याची तक्रार केली आहे. त्यांनी केलेल्या तक्रारीनुसार, जाहिरातीत विमल पान मसाल्यात केशर असल्याचा दावा केला जातो. मात्र, केशर व विमल पान मसाला यांच्या दरामध्ये मोठा फरक आहे. या जाहिरातीची टॅगलाईन ‘दाने दाने में है केसर का दम’ ही आहे, यामुळे वाद निर्माण झाला आहे. तक्रार करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, केशरची एका किलोची किंमत ही जवळजवळ चार लाख आहे, तर विमल पान मसाल्याचे एक पॅकेट पाच रुपयाला विकलं जातं, त्यामुळे या पान मसाल्यात खरे केशर असण्याची शक्यता कमी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण केंद्राचे अध्यक्ष ग्यारसीलाल मीणा व सदस्य हेमलता अग्रवाल यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. तसेच त्यांनी कलाकारांना आणि कंपनीच्या अध्यक्षांना नोटीस बजावली असल्याचे समोर आले आहे. तक्रारदाराने त्यांच्यावर खोटे दावे पसरवण्याचा आणि विमल पान मसाल्याच्या जाहिरातीद्वारे ग्राहकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. आता या प्रकरणात पुढे काय होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Story img Loader