Boman Irani Struggle : सिनेविश्वात आपल्या दमदार अभिनयाने अभिनेते बोमन इराणी यांनी मोठं नाव कमावलं आहे. बोमन इराणी त्यांना दिलेलं प्रत्येक पात्र अगदी चोख बजावतात. चित्रपटात दिसणारी खलनायकाची भूमिका असो अथवा एखादी विनोदी भूमिका, आपल्या अभिनयाच्या जादूने ते प्रत्येक पात्र जिवंत करतात. या हरहुन्नरी अभिनेत्याने आज यशाचं मोठं शिखर गाठलं आहे. त्यांची वेगळी ओळख सांगण्याची आता गरज नाही. मात्र, यशाच्या मार्गाने वाटचाल करताना त्यांनी सुरुवातीला बराच संघर्ष केला आहे. सिनेविश्वात झळकण्याआधी त्यांनी बेकरीमध्ये काम केलं आहे. इतकंच नाही तर त्यांनी हॉटेलमध्ये वेटरचीसुद्धा नोकरी केली आहे.

बोमन इराणी यांनी आजवर रुपेरी पडद्यावर अनेक भूमिका साकारल्यात. त्यातील त्यांची ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटातील डॉक्टर अस्थाना आणि ‘३ इडियट्स’ चित्रपटातील वीरू सहस्त्रबुद्धे या भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात कायमचं घर केलं आहे. अशा या अवलियाचा आज वाढदिवस आहे. २ डिसेंबरला ते आपला वाढदिवस साजरा करतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

हेही वाचा : Pushpa 2 च्या प्रदर्शनाआधी अल्लू अर्जुन विरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

४४ व्या वर्षी पहिला चित्रपट

यश मिळवण्यासाठी कोणत्याही वयाची अट नसते हे बोमन यांनी त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून सिद्ध केलं होतं. वयाच्या ४४ व्या वर्षी त्यांचा पहिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आजवर बोमन यांनी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. मात्र, सुरुवातीच्या काळात त्यांना बराच संघर्ष करावा लागला.

‘या’ हॉटेलमध्ये केली वेटरची नोकरी

दैनिक भास्करच्या हवाल्याने जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, सुरुवातीला बोमन इराणी बेकरीमध्ये काम करायचे. त्यांच्या बेकरीमध्ये बटाट्याचे वेफर्स बनवले जात होते. यात ते वेफर्स पॅकिंगपासून दुकानावर त्याची विक्री करणे अशी कामे करायचे. खरं तर ही बेकरी त्यांची आई चालवत होती. मात्र, आईच्या आजारपणामुळे पुढे कुटुंबाचा भार त्यांच्या खांद्यावर आला आणि त्यांनी बेकरी चालवण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना जास्त पैसे मिळत नव्हते. मात्र, घरखर्च निघेल अशा पद्धतीने ते पैसे कमवायचे. इतकेच नाही तर बोमन यांनी चक्क हॉटेलमध्ये वेटर म्हणूनसुद्धा काम केलं होतं. बेकरीमध्ये काम करण्याआधी ते ताज हॉटेलमध्ये वेटरचे काम करायचे. तसेच १९७९ ते १९८० या काळात त्यांनी रुम सर्विस, वेटर आणि बार टेंडरची कामे केली आहेत.

बोमन यांना फोटोग्राफीची आवड होती. ते नाटकांमध्येसुद्धा काम करायचे. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक चित्रपटांची ऑफर येत होती, मात्र त्यावेळी त्यांनी फोटोग्राफीची आवड जोपासण्यासाठी दोन चित्रपटांची ऑफरही नाकारली होती. बोमन इराणी यांच्या अभिनयाची चर्चा ते नाटकात काम करत होते तेव्हापासूनच होती. त्यांच्या नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी थेट दिग्दर्शक आणि निर्मातेसुद्धा हजेरी लावायचे.

हेही वाचा : “कुछ तो गडबड है दया…”! शिवाजी साटम यांचे छोट्या पडद्यावर पुनरागमन; ‘सीआयडी’चं नवीन पर्व ‘या’ तारखेपासून प्रेक्षकांच्या भेटीला

‘या’ निर्मात्यामुळे पालटलं नशीब

बोमन इराणी यांना ते साधाराण ४२ वर्षांचे असताना एक शॉर्टफिल्म मिळाली होती. यातील त्यांचा अभिनय प्रसिद्ध निर्माते विधू विनोद चोप्रा यांनी पाहिला होता. त्यानंतर त्यांनी लगेचच दोन लाखांचा चेक देत ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटाची ऑफर दिली. या चित्रपटात झळकल्यानंतर बोमन यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आणि एका रात्रीत त्यांनी मोठी प्रसिद्धी मिळवली.